भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
आदिवासींचा तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात ज्यांच्या अस्तित्वाचीच दखल घेतली जात नाही असे आदिवासी अजूनही आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी एकीकडे सुरू असतांना दुसरीकडे हे भयाण वास्तव अस्वस्थ करणारे आहे. जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यात अस्वली स्टेशन गावाजवळ नदीकाठच्या खडकांवर रहात असलेल्या आदिवासी कुटुंबातील मंदाकिनी संजय मुकणे या अवघ्या सात वर्षाच्या चिमुकलीचा आजच सर्पदंशाने मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात सुध्दा याच वस्तीतली एक महिला सुद्धा याचप्रकारे दगावली. नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना या भगिनीचा मृत्यू झाल्यानंतर ह्या लोकांना तिचा मृतदेह वस्तीत आणण्यासाठी सुद्धा मोठा आटापिटा करावा लागला. कमालीचे अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, जगण्याची भ्रांत आणि शासकिय अनास्थेमुळे कोणतीच योजना ज्यांच्यापर्यंत पोहचतच नाही अशी ही आदिवासी कुटुंबे आहेत. वीज नाहीच, पण अंधार घालवण्यासाठी रॉकेल नसल्याने गोडेतेलाचे दिवे बनवले तर भटक्या कुत्र्यांकडून त्या दिव्यांतील तेलही पिऊन टाकले जाते. आयुष्य रात्रीचा भौतिक अंधार आणि दिवसाउजेडी प्रशासनाच्या अनास्थेचा अंधार सहन करीत रडतखडत सुरु आहे. ह्या वस्तीतले दोन मृत्यू आणि तिथली एकूणच परिस्थिती पाहता आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला “इगतपुरीनामा”ने तिथले वास्तव जाणून घेण्यासाठी भेट दिली. उद्या आदिवासी दिन आहे हे तुम्हाला माहिती आहे का अशी विचारणा केल्यावर तिथल्या भिल्ल आणि कातकरी बांधवांनी “आदिवासी दिन म्हंजी काय रं भाऊ ?” असा उलट सवाल केला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असतांना ह्या भयंकर वास्तवाची दाहकता चटका लावणारी आहे. जागतिक आदिवासी दिनावर बॅनरबाजी आणि इतर अनावश्यक गोष्टींवर होणारा खर्च थोडाफार जरी ह्या वस्तीवर झाला तरी इथल्या आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवण्यासाठी ते सहाय्य ठरेल. इगतपुरी तालुक्यात अशा अनेक वाड्या वस्त्या आहेत जिथे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. इगतपुरी तालुक्यात मुकणे धरणाचे पाणी जिथून वाहते त्या ओंडओहोळ नदीच्या काठावरील खडकांवर ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एक भिल्ल, कातकरी वगैरे आदिवासी समाजाची फाटक्या तुटक्या कापडांची घरे बनवलेली वस्ती आहे. काही वर्षांपूर्वी ह्या भिल्ल वस्तीच्या झोपड्यांची संख्या साधारणपणे २०-२५ होती. काळाच्या ओघात विविध कारणांनी ह्या अनेकांचे स्थलांतर झाल्यानेही संख्या कमी झालेली आहे. जेथे ही वस्ती आहे,त्या जागेला अनेक वर्षांपासून ” खल्लाळ ” म्हणून ओळखले जाते. अन ह्या खल्लाळ जागेवरून ह्या भागात “खल्लाळाला बारा वाटा” हे गाणे सुद्धा इथं प्रसिध्द आहे. ह्या वस्तीतील लोकांचं जीवनमान खडतर, अवघड, उघड्यावर, सतत धोक्याचं. नदीच्या काठावर अन काळ्या कुळकुळीत खडकावर ही वस्ती असल्याने कायम शेजारून वाहणाऱ्या पाण्याचा, पुराचा धोका आपल्या उरावर घेऊन ही लोक जगतात. आजूबाजूला असणाऱ्या शेतीत मजुरी करणं, मासेमारी करणं अन काही काळापूर्वी शेजारील संरक्षण खात्याच्या एरियात फायरिंगमधून पडणारे भंगार वेचून उपजीविका करणारी ही वस्ती आहे. कायम दारूच्या आहारी गेलेली ही वस्ती कायम धोक्याचं जीवन जगणाऱ्या लोकांची आहे.
ह्या वस्तीच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य कायमच धोक्यात आलेले दिसते. जगण्यासाठी आईवडिलांच्या मार्गांवर चालून मुले शाळाबाह्य होतात. मुलांना शिक्षण नाही किंवा त्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न करणारी कोणतीही सरकारी यंत्रणा नाही. कोणतीही सामाजिक संस्था मदतीला येत नाही. कायम अंगावरील कपड्यांअभावी उघड्यावर खेळणारी ह्या वस्तीतील मुले पाणी, विंचू -काटा, रस्त्यावरील अपघात ह्या समस्यांचा गर्तेत अडकलेली असतात. ह्यांच्या मागील पिढ्या हलाखीचे जीवन जगत आल्या. तीच परंपरा पुढे कायम घेऊन तेच जिणं मानगुटीवर घेऊन पुढील येणाऱ्या पिढ्या सुद्धा तेच जीवन जगत आहेत. अनेकांना संरक्षण विभागातील भंगार वेचतांना, दारूच्या नशेत त्याच ठिकाणी मरण पत्करावं लागलेलं आहे. ह्या वस्तीतील लोक पुरुष अन स्त्रिया असे दोन्हीही दारूच्या नशेत अडकलेली. ह्या लोकांना ह्या जीवनमानातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना यांच्यासाठी आहेत. पण त्या ह्या घटकांपर्यंत पोहचत नाही. त्यासाठी विशेष मोहीम राबवणे आवश्यक आहे. ह्यांची मुले शाळेपासून वंचित न राहता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. कायम व्यसनापासून मुक्ती कशी होईल ह्यासाठी सामाजिक संस्थांनी इथं ग्राउंड लेव्हलला काम केलं पाहिजे. तरच यांचे जीवनमान बदलण्यासाठी चांगले होईल. नाहीतर खल्लाळाला बारा वाटा ह्या गाण्याप्रमाणे यांच्या जीवनाचे बारा वाजत राहतील. अनेक वर्षे जागतिक आदिवासी दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होत राहील. पण ह्या अन अशा अनेक भिल्ल, कातकरी वस्त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहील त्याचे काय ? “आदिवासी दिन म्हंजी काय रं भाऊ ?” हा सवाल सुद्धा अनेक वर्ष घुमत राहील यात शंकाच नाही. ( बातमीसाठी विठोबा दिवटे पाटील यांनी सहाय्य केले. )