टिटोली येथील सर्व शिक्षकांनी पदरमोड करून उभारली इगतपुरी तालुक्यातील पहिली वायफाय युक्त शाळा : सरपंच अनिल भोपे यांच्यासह तालुकाभरातून शिक्षकांचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

डिजिटल माध्यमे प्रभावी असल्याने शिक्षणातही डिजिटल माध्यमांचा चांगला उपयोग होत असतो. नवनवे तंत्रज्ञान, सुलभ पद्धती, जागतिक घडामोडी, संदर्भ अभ्यास आदींमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवंत करण्यात हातभार लागतो. ह्या सगळ्या क्षेत्रांचा परिपूर्ण फायदा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी इगतपुरी तालुक्यात टिटोली जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक सातत्याने प्रयत्नरत असतात. ह्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा टिटोली येथील शिक्षकांनी स्वखर्चाने वायफाय युक्त शाळा उभी केली आहे. 

सध्याच्या डिजीटल युगात तंत्रज्ञान उपलब्ध असताना त्याचा वापर न करणे चुकीचे आहे. ‘व्हिज्युअल माध्यमांमध्ये मोठी ताकद आहे. जे ऐकले त्यापेक्षा जे पाहिले ते लक्षात राहते. शाळेमध्ये मोबाइल तसेच संगणक, प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षणाला पूरक व्हिडिओ किंवा अन्य गोष्टी दाखवणे गरजेचे आहे. खरंतर पूर्वी शिक्षकांना वर्गात मोबाइल नेण्यास तथा वापरण्यावरही काही अंशी बंदी होती. परंतु वैश्विक महामारीने ऑनलाईन शिक्षणातुन डिजीटल माध्यमांद्वारे शिक्षण देणे किती महत्वाचे आहे ही गरज ओळखली. त्यासाठी टिटोली शाळेतील शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत शाळेसाठी वायफाय जोडुन घेतले. दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण दिले जावे यासाठी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांमार्फत गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे महत्वाचे आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत टिटोलीचे सरपंच अनिल भोपे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार मानले. अशाप्रकारचे विकसित विचार असणारे शिक्षक आमच्या गावाला लाभले याचा आम्हांला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. शाळेतील 173 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल असे शाळेच्या  मुख्याध्यापिका मंगला शार्दूल यांनी आपले मत व्यक्त केले. इगतपुरी २ केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे याबाबत कौतुक करत अभिनंदन केले.

उन्नत आणि समृद्ध पिढी निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा टिटोली येथील शिक्षकांनी वायफाय युक्त शाळेला दिलेले योगदान अतिशय मौल्यवान आहे. इगतपुरी तालुक्यातील पहिली वायफाय शाळा म्हणून टिटोली शाळेचा अभिमान वाटतो. ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करते.

- डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी इगतपुरी

शाळेचे विविध उपक्रम Smart Z. P. school Titoli या स्वनिर्मित यु ट्युब चॅनेलवर प्रदर्शित केले जातात. शाळेतील राज्य तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांचे स्वत:चे “चला शिकु या” या नावाचे यु ट्युब चॅनेल तसेच शैक्षणिक ब्लॉग असुन राज्यातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे शैक्षणिक व्हिडीओ प्रदर्शित केले जातात. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक राजकुमार गुंजाळ, उपशिक्षिका प्रतिभा सोनवणे, मंगला धोंडगे, योगिता पवार आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुरक अध्ययन अनुभव देण्यासाठी वायफायचा वापर TV, संगणकाव्दारे करून देणार असल्याची ग्वाही दिली. इगतपुरी तालुक्यातुन सर्वच स्तरावरून टिटोली शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदनही करण्यात येत आहे. याप्रसंगी
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत टिटोलीचे सरपंच अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्या मोनाली राऊत, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, चित्रपट दिग्दर्शक धनराज म्हसणे, केंद्रप्रमुख श्रीराम आहेर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!