इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेला महिना उलटत आला. मात्र अद्याप शासनाचा चौकशी अहवाल गुलदस्त्यातच आहे. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येच्या वेळी लिहीलेल्या सूसाईड नोटमध्ये विनोद शिवकूमार व व्याघ्रप्रकल्प संचालक हे नियमबाह्य काम करण्यास लावत होते असा उल्लेख आहे. म्हणजेच वरील दोन्ही अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. असा आरोप करत
त्यांच्या संपत्तीची तसेच सर्व कार्यालयीन बाबींची चौकशी व्हावी यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा. त्यात माजी पोलीस महासंचालक, माजी मुख्यवनरक्षक यांचा समावेश करून खातेनिहाय चौकशी करावी. यासह त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून 25 मार्च रोजी आपल्या कार्यालयात गोळी झाडत आत्महत्या केली होती. आत्महत्या वेळी दीपाली चव्हाण यांनी विनोद शिवकुमार यांच्या
जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले हाेते. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. दरम्यान विनोद शिवकुमारकडून होणाऱ्या प्रत्येक त्रासाची, जुलुमाची माहिती दीपाली चव्हाण यांनी वनसंरक्षक रेड्डी यांना दिली होती. मात्र वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे विनोद शिवकुमार प्रमाणे श्रीनिवास रेड्डी हे आत्महत्या प्रकरणात सहभागी आहेत. शासकीय यंत्रणेतील विकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळे ही आत्महत्या झाली यामुळे महिला कर्मचारी धास्तावल्या आहेत. मृत दिपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करावी असेही पत्रात नमूद आहे.
चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी तपास करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे. शासनाने अप्पर पोलिस महासंचालक महाराष्ट्राचे आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांची चौकशी अधिकारी शासनाने चौकशी अधिकारी म्हणून नेमणुक केली आहे. त्याबद्दल जिजाऊ ब्रिगेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. अप्पर पोलिस महासंचालक महाराष्ट्राचे आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांनी 30 एप्रिल पर्यंत अहवाल द्यायचा आहे. सध्या त्या अमरावतीत आहेत. ते चौकशी कधी व कशी करणार? ते अहवाल कधी देणार? अहवाल निष्पक्ष होणार का? कमी वेळात चौकशी कशी केली जाईल ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांना क्लीन चिट तर देण्याचा प्रकार नाही ना ? असा प्रश्नही माधुरी भदाणे यांनी उपस्थित केला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे दिपाली चव्हाण प्रकरणात नक्कीच आर्थिक धागेदोरे असण्याची शक्यता आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून त्यात माजी आयपीएस पोलीस महासंचालक, माजी मुख्यवनसंरक्षक यांचा त्रिस्तरीय समितीत समावेश करून खातेनिहाय चौकशी करावी. त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. महिला आयोगाने याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी दखल घ्यावी.
– माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र