
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यात खराब रस्त्यांमुळे होणारी वाहनधारकाची कसरत कधी थांबेल ? रस्ते दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे करणार आंदोलनास अशा आशयाचे वृत्त “इगतपुरीनामा”ने प्रसिद्ध केले. ह्या धसक्याने सुस्त सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. मुंढेगाव ते अस्वली स्टेशन रस्त्याचे दुरुस्तीचे काम मार्गी लागल्याने वाहनधारकांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांचे आभार मानले आहेत. हा रस्ता गेल्या एक वर्षांपासून खराब होता. अनेकांनी पाठपुरावा करूनही यश मिळाले नव्हते. मात्र इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना खराब रस्त्याबाबत वारघडे यांनी निवेदन दिले होते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या होत्या. वारघडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल. या धसक्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू केले आहे. एक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीचे नावच घेतले जात नसल्याने अनेक कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी नेण्यासाठी खूप मोठी अडचण होती. रस्त्याचे काम मार्गी लागले याचे समाधान आहे.
- तुकाराम वारघडे, सामाजिक कार्यकर्ते
या रस्त्यामुळे वाहने सतत नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी कायमच लेखी पत्रकाद्वारे होत असूनही रस्ते दुरुस्त का केले जात नाही असा सवाल तुकाराम वारघडे यांनी केला होता. प्रत्यक्षात आता रस्त्याचे काम मार्गी लागले असून वाहनधारकांनी आभार मानले. यावेळी तुकाराम वारघडे यांनी रस्ता दुरुस्त होत असल्याची प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी वसंत गतीर, बाळा गवारी, विनायक गतीर, काशिनाथ पोटकुले, नगरसेवक उमेश कस्तुरे, सुनिल रायकर, श्रीराम बोटे, सरपंच ऋषिकेश गतीर आदी उपस्थित होते.
