भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
सर्वांना मिळणाऱ्या यशामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सिंहाचा वाटा असून नारीशक्तीमुळेच जगाचा विकासाचा आलेख उंचावला आहे. महिलांचा सन्मान महिला दिनाच्या दिवशी होण्यापेक्षा रोजच झाला पाहिजे. यासह महिला सक्षम झाल्या तरच देशाची वाटचाल सक्षमतेकडे होईल. म्हणून महिलांनी समर्थपणे आत्मोन्नती करावी असे प्रतिपादन इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प इगतपुरी यांच्यातर्फे मुंढेगाव येथे तालुकास्तरीय जागतिक महिला दिनाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभापती सोमनाथ जोशी बोलत होते. उपसभापती विठ्ठल लंगडे आपल्या भाषणात म्हणाले की, कुटुंबाला पुढे नेण्यासाठी महिलांची शक्ती प्रत्येकाला आवश्यक असते. त्यानुसार लक्ष्मीस्वरूप महिलांना सन्मान देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे म्हणाल्या की, महिलांनी डळमळीत आणि मुळमुळीत भूमिका सोडून कठोर भूमिका पत्करावी. आर्थिक समृद्धी केल्यास महिलांना आत्मनिर्भर होता येईल. दबावाने कुटुंबात वावरणे सोडावे आणि आत्मविश्वास वाढवून समाजाला शिस्त लावावी. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी मुलींचा जन्मदर, महिलांचे आजार, घ्यावयाची दक्षता आणि निरोगी आरोग्यामुळे पुढे जाण्याचा मूलमंत्र दिला. कोणाची वाट न पाहता चांगल्या गोष्टींची सुरुवात महिलांनी स्वत:पासून करावी असे ते म्हणाले. इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर सोनवणे यांनी महिलांना सामाजिक जीवनात येणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला असून त्यांच्यामुळेच सदृढ भारत निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचे नुकसान कोणीतरी महिलाच करत असतात. महिलांमधील निरर्थक आणि बाष्कळ सवयींना बदलत्या काळात लगाम घालणे आवश्यक असल्याचे सांगत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामाच्या तुलनेत योग्य मोबदला दिला जात नसल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी कु. वैष्णवी गतीर, आराध्या गतीर, मयुरी गतीर, अंकिता गोऱ्हे आदी चिमुरड्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांची शाबासकी मिळवली. इगतपुरी तालुक्यातील विविध गावांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, निवृत्त पर्यवेक्षिका फरजाना नाईकवाडी, संगीता गोईकणे, वंदना तुपे, सुलोचना भोसले, संगीता रोकडे आदींचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे. कार्यक्रमाप्रसंगी इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकरी पंडित वाकडे, संरक्षण अधिकारी श्री. वाघ, पर्यवेक्षिका ज्योती काळे, हर्षदा कुवर, ललिता चौधरी, पूर्वा दातरंगे, नीलम बांबळे, सुखदा पाराशरे, अलका खांदवे, चित्रा कुलट, सरपंच संगीता हंबीर, उपसरपंच इंदूबाई गतीर, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, ग्रामविकास अधिकारी ऋषिकेश नागरे, भरत कोरडे, अंगणवाडी सेविका सविता रोकडे, सत्यभामा गतीर, ललिता गतीर आदींसह तालुकाभरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विश्वंभर गतीर, योगेश्वर तांगडे यांनी केले.