भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ ( अ ) मधून निवडून आलेल्या शिवसेना नगरसेविका सीमा प्रल्हाद जाधव यांना नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी अनर्ह अर्थात अपात्र ठरवले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे. आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या निवडणुक विवादानुसार हा आदेश काढण्यात आला आहे. यामुळे इगतपुरी शहरात चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, व औद्योगिकनगरी अधिनियम 1965 च्या कलम 44 ( ई ) अन्वये आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे यांनी 2021 मध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवडणूक विवाद अर्ज दाखल केला होता. यावर वेळोवेळी सुनावण्या घेऊन दोन्ही पक्षकार आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार 19 एप्रिलला अंतिम सुनावणी होऊन विवाद प्रकरण निर्णयासाठी बंद करण्यात आले. ह्या प्रकरणाचा निकाल आज नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी घेतला. त्यांच्या आदेशानुसार इगतपुरी येथील शिवसेना नगरसेविका सीमा प्रल्हाद जाधव यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे इगतपुरी शहरात खळबळ माजली आहे.