लेखन : निलम गायकवाड, पुणे
समुद्राने नदीला विचारले,तू कुठेपर्यंत माझ्यावर प्रेम करशील…? नदीने हसून उत्तर दिले “तुझ्यात गोडवा येत नाही तोपर्यंत..!” वैवाहिक जीवनाचे सुद्धा असेच असते जोपर्यंत पती पत्नी ही संसाराच्या रथाची चाके एकमेकांना सांभाळत, समजावून घेत संसार करत नाही तोपर्यंत सुखी संसार होणार नाही. सर्वांना valentines day माहीतच असेल पण Husband Appreciation Day/ पती कौतुक दिन कधी असतो माहित आहे का ? तर हा दिवस असतो एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातील शनिवारी. काल हा दिवस होऊन गेला पण अनावधानाने यावर व्यक्त व्हायचे राहून गेले. पूर्वी नवरा म्हटले तर एक वेगळी दहशत असायची. मारहाण करणारा, शिव्या देणारा, हुंडा घेणारा, अत्याचार करणारा परंतु आता हे चित्र बदलत चालले आहे. आता पूर्वीसारखे नवरे नाही राहिले. जर आपण इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या पाठीशी महात्मा फुले उभे राहिले आणि दोघांनी मिळून शिक्षणाचा वसा घेतला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी संस्थानाची सूत्रे सांभाळली यात मल्हारराव होळकर यांचा खूप मोठा आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनादेखील त्यांच्या पतींनी खूप साथ दिली आहे. डॉ. राणी बंग यांनी समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले होते. यामध्ये त्यांचे पती डॉ. अभय बंग यांनी साथ दिली. जसे “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो”.
पाश्चात्य देशातून विविध फॅड उदयास येतात. Mothers Day, Fathers Day, Brothers Day आदी एकमेकांप्रती कृतज्ञता दाखवणे हा यामागचा हेतू असला तरी नाते मजबूत करण्यासाठी हे दिवस साजरे करणे आवश्यक आहे. कोरोना काळात आपण सर्वांनी पाहिले असेल की पुरुषांनीसुद्धा स्त्रियांना घरकामात मदत केली. विविध पदार्थ बनवले.
“स्त्री कुठे काय करते ?” या प्रश्नाचे उत्तर अनेक पतींना मिळाले असेल. त्यांनी स्त्रियांना जवळून पाहिले, अनुभवले, तिला होणाऱ्या वेदना, तिने केलेला त्याग, तिची होणारी तारेवरची कसरत, मासिक पाळीत होणाऱ्या असह्य वेदना या सर्वांची जाणीव पतींना आता होत आहे. आता चित्र बदलत आहे. गर्भवती स्त्री फक्त बाळाची काळजी घेते असे नाही तर त्या बाळाला जन्म देणारा त्याचा पिता पण काळजी घेत असतो. मुलांच्या आजारपणात फक्त आईच जागरण करते असे नाही तर मुलाचे वडीलसुध्दा रात्रभर जागे असतात. काळानुरूप प्रचंड बदल घडत आहे. पुरुष दिवस साजरा होतोच परंतु Husband Appreciation Day ही संकल्पना ज्याला सुचली त्यांचे खरंच मनापासून आभार मानले पाहिजे. पतीचे कौतुक झालेच पाहिजे. एक पत्नी नाही करणार तर कोण करणार ?
अहो घरोघरी मातीच्या चुली आहेत. माझा नवरा असाच आहे, तसाच आहे, प्रेम करत नाही, फिरायला नेत नाही, काही गिफ्ट देत नाही, कोणत्याच गोष्टीचे कौतुक नसते. प्रेम करत नाही, स्वतःच्या घरच्यांना अधिक महत्व दिले जाते. सर्व नवरे सारखेच. ही पदवी देऊन समस्त स्त्रिया मोकळ्या होतात. जसे स्त्री लग्न झाल्यावर अनेक गोष्टींचा त्याग करते तसेच नवरा झाल्यावर त्याने पण किती गोष्टींचा त्याग केलेला असतो याचा आपल्याला विसर पडतो. आधी त्याचे मित्रच त्याच्यासाठी सर्व काही असतात. परंतु जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यात येता तेव्हा मित्रप्रेम कमी होते. आणि सुरू होतो जबाबदारीचा खेळ. घरी वाट पाहणारी पत्नी, मुले त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सतत त्याला भेडसावतो. मुलांचे शिक्षण, नातेवाईक, मित्र, हट्ट करणारी बायको, घरातील वृद्ध आई वडील या सर्वांची जबाबदारी नवऱ्यावर येते. जर स्त्रियांचे कौतुक होते तर मग नवऱ्याचे कौतुक पण व्हायला पाहिजे की नको ???? सतत गाऱ्हाणी गाण्याऐवजी तुमचा पती तुमच्यासाठी खूप काही करत असतो. काही जण व्यक्त होतात.काही जणांना व्यक्त होता येत नाही. पतीला पण कौतुकाची गरज असते. मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर एकही भाव उमटू न देता हसरा चेहरा घेऊन तो मिरवत असतो. त्याला स्त्रियासारखे घाय मोकलून रडता पण येत नाही. दिवसभर काम करून थकला तरी त्याला कोणी विचारत नाही, अहो आज दमलात का? कसा गेला आजचा दिवस? एखाद्या सणाच्या वेळी आपल्या बहिणीला काही घ्यायचे असेल तरी त्याला विचार करावा लागतो. मुलांचा हट्ट पुरवणे, बायकोचा हट्ट पुरवणे यामध्ये त्याची तारेवरची कसरत होत असते परंतु नवरा कधी ते जाणवू पण देणार नाही. एक पत्नी म्हणून आपण समजून नाही घेणार तर मग कोण घेणार? त्याच्याबद्दल कृतज्ञ होणे आवश्यक आहे.
चला तर मग या वर्षांपासून आपण Husband Appreciation Day साजरा करूयात. तुमच्या नवऱ्याला सगळ्यांसोबत धमाल करणे आवडते की शांतपणे दोघांचा सहवास आवडतो हे तर तुम्हीच चांगल्या पद्धतीने जाणता त्यानुसार celebration ठरवा. तुमचं प्रेम व्यक्त करा. वैयक्तिक आवड बाजूला ठेवून नवऱ्याला आवडणाऱ्या गोष्टीतही थोडासा रस दाखवा. आर्थिक तडजोड करताना त्याने त्याच्या छंदाला तिलांजली दिलेली असते ती आवड, तो छंद पूर्ण करण्याचा मार्ग त्यांना मिळवून द्या. नवरा रसिक नाही, भावनाहीन आहे अशा तक्रारीचा सूर थांबवा. त्याचे पण कौतुक करा. “भला है,बुरा है,जैसा भी है,मेरा पती मेरा देवता है” या गाण्याप्रमाणे तो कसाही असला तरी तो तुमचा पती आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि कौतुक करायला विसरू नका हं..!
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps