जवळ आला आदिवासी “दिन” ; शाळा बंद झाल्याने आदिवासी विद्यार्थी झाले “दीन” : श्रमजीवी भरवणार गटशिक्षणाधिकारी दालनात शाळा

दरेवाडीपासून इगतपुरीला विद्यार्थी पायपीट करून येणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचा निर्णय झाला आहे. इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने बुधवारी शाळा बंद करण्याबाबत पत्र दिल्याने शाळेची घंटा वाजली नाही. या शाळेतील पहिली ते चौथीचे विद्यार्थी आज शाळा का उघडली नाही म्हणून विचलित झाल्याचे दिसले. ह्या चिमुरड्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शाळा नसल्याने नुकसान होऊ नये म्हणून श्रमजीवी संघटनेकडून उद्या इगतपुरी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवण्याचे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. जागतिक आदिवासी दिन जवळ आला असतांना आदिवासी विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेतील मुलांनीच गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून उद्या सर्व मुले आपली दप्तरे घेऊन पायी चालत पंचायत समितीमध्ये शाळेसाठी येणार आहेत.

दरेवाडी ही आदिवासी वाडी भाम धरणासाठी संपादित झाल्याने तेथील 40 कुटुंबांचे स्थलांतर एका ठिकाणी करण्याचे निश्चित झाले. मात्र आम्ही त्या जागेत जाणार नाही, अन्य जागा आम्हाला द्या अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतली. यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सोयीस्कर जागेत स्थलांतर केले. मधल्या काळात गावकऱ्यांना तात्पुरती मिळालेली जागा आवडल्याने त्यांनी ह्याच जागेत स्थलांतर करण्याचे निश्चित केले. ह्यावेळी हा वाद सुरु असल्याने नव्या ठिकाणी स्थलांतर होईपर्यंत शाळा दोन्ही ठिकाणी भरवावी असा निर्णय घेतला होता. आता त्याबाबतीत असलेला वाद संपल्याने शाळा व्यवस्थित सुरु असतांना गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा बंद करण्याचा आदेश बजावला. परिणामी येथील आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आता शाळा कुठे शिकायची? अस प्रश्न उपस्थित झाल्याने श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी उद्या इगतपुरी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ह्या विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. गाव कमिटी प्रमुख गणपत भाऊ गावंडा, उपप्रमुख विमलताई कमळू गावंडा, सचिव रमेश गंगाराम गावंडा, सामाजिक कार्यकर्ता सितारामभाऊ गावंडा, बाळू देवराम गांगड, साईनाथ यशवंत गावंडा, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ निवृत्ती गावंडा यांनी आंदोलन करणार असल्याचे कळवले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!