लेखन – भास्कर सोनवणे, मुख्य संपादक
महत्वाची सूचना : ह्या लेखाची कॉपी करण्याला परवानगी नाही.
वाडीवऱ्हे ह्या जिल्हा परिषद गटातून इगतपुरी तालुक्याला नवे नेतृत्व निर्मित करुन देणारे आरक्षण पडले असल्याची ऐतिहासिक बाब आहे. वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकीय नेत्यांना सहाय्य करणाऱ्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे नवे नेतृत्व ह्या गटामधून इगतपुरी तालुक्याला लाभणार आहे. घोटी ह्या महत्वपूर्ण गटातुन अभूतपूर्व आणि तुल्यबळ लढती काय असतात ह्याची प्रचिती लोकांना अनुभवता येणार आहे. यासह साकुर सारख्या अनेकदा तालुक्याला सभापती देणाऱ्या गणातून सुद्धा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा सामान्य व्यक्तीला पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवायला मिळणार आहे. खंबाळे ह्या जिल्हा परिषद गटामधून लढण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रबळ दावेदारांच्या सौभाग्यवतींचा प्रयत्न असणार आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावून लढणाऱ्या रथी महारथी उमेदवारांचा गट अशी नवी ओळख ह्या गटाची होणार आहे. बहूप्रतीक्षेनंतर नांदगाव सदो ह्या गटात लागलेल्या सर्वसाधारण आरक्षणामुळे ह्या गटातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे ह्या गटात सुद्धा तुंबळ लढा होण्याची जास्तच शक्यता आहे. धामणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक वेळी उमेदवारांची मोठी संख्या असते. यावेळी सुद्धा विक्रमी संख्येने उमेदवार असणार आहेत. यासह आलेल्या “समृद्धी”मुळे खुळखुळणारे अर्थकारण हे राजकारण बनणार आहे.
काँग्रेसच्या नयना गावित यांनी जिंकलेला वाडीवऱ्हे गट अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्याने ह्या गटामधील अनेकांच्या मनसूब्यांवर पाणी पडले आहे. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांचा लागलीच शोध सुरु केला असून ह्यासाठी आखणी सुरु केली आहे. साकुर गण सुद्धा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी तर वाडीवऱ्हे गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. ह्या सर्वांचे संतुलन साधून ह्या गटात लढती होतील. नयना गावित यांना अन्य गटाचा आधार घ्यावा लागू शकतो.
खंबाळे गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने ह्या भागातील नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांचा वरचष्मा असणारा हा जिल्हा परिषद गट आहे. गेल्यावेळी आरक्षणामुळे अनिता बोडके यांना सुरगाणा तालुक्यातून लढावे लागून जिल्हा परिषदेत एंट्री मिळाली होती. यावेळी मोठ्या ताकदीने त्यांच्याकडून ही निवडणुक लढली जाईल. यापूर्वी शिवसेनेतर्फे सुशीला मेंगाळ ह्यांना गटाने संधी दिली होती. सुशीला मेंगाळ आता घोटी गटामध्ये लढणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. ह्या गटातून प्रचंड तुल्यबळ लढती होणार आहेत. कावनई गण सर्वसाधारण आणि खंबाळे गण सर्वसाधारण महिलेला आरक्षित असल्याने अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना रिंगणात उतरता येईल. यामुळे गटाचा विजय सुकर होणार असल्याने ह्या दोन्ही गटात फायदेशीर उमेदवार दिले जातील.
धामणगाव गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्याने इच्छुकांची खूपच मोठी संख्या आहे. अभूतपूर्व निवडणुकीचा फड ह्या गटामध्ये पाहायला मिळू शकतो. शिवसेनेचे विद्यमान सदस्य हरिदास लोहकरे यांची आरक्षणामुळे अडचण झाली असली तरी त्यांची आगामी काळातील भूमिका काय आहे यावर सुद्धा आडाखे अवलंबून आहेत. ह्या गटातील धामणगाव आणि बेलगाव तऱ्हाळे हे दोन्ही गण सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने गटाची निवडणूक सोपी व्हायला चांगली मदत होऊ शकते. समृद्धीमुळे आलेली बरकत पाहता ह्या गटामध्ये निर्णायक लढा देणारे तुल्यबळ उमेदवार पाहायला मिळतील. हा भाग सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडलेला असल्याने विधानसभेचे राजकारण उफाळून येणार आहे.
नांदगाव सदो हा गट सुद्धा सर्वसाधारण साठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे इच्छुकांना जिल्हा परिषदेचे स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे कावजी ठाकरे यांना ह्या गटामधून संधी मिळाली होती. विविध राजकीय आणि जातीय समीकरणे ह्या गटात आहेत. निर्णायक क्षमता असणारी ह्या गटात अनेक गावे असल्याने त्यावरही अनेक गोष्टी अवलंबवून आहेत. काळुस्ते गण सर्वसाधारण महिलेसाठी तर नांदगाव सदो गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने ह्या दोन्ही उमेदवारांवर गटाच्या उमेदवाराची खरी भिस्त असणार आहे. ह्या गटात होणाऱ्या लढती निश्चितच लक्षवेधी असतील.
राष्ट्रवादीचे उदय जाधव यांचा बालेकिल्ला समजला जाणारा घोटी बुद्रुक हा जिल्हा परिषद गट आहे. यावेळी हा गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला आहे. ह्या गटामधून जोरदार आणि तुंबळ असणारी रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे. माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्ती एकमेकांविरोधात लढतांना ह्याच गटात पाहायला मिळेल. मोठी आर्थिक बाजारपेठ आणि अनेक समीकरणे अशी ह्या गटाची विशेषता आहे. घोटी गण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी तर मुंढेगाव गण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने ह्यावर सुद्धा उमेदवारांचे कौशल्य पणाला लावावे लागेल. अनेक प्रकारच्या व्यूव्हरचना केल्याशिवाय ह्या गटात उमेदवारांना पर्याय नाही.
इगतपुरी तालुक्यातील आगामी निवडणुकांचा सारांश असा आहे
मागील निवडणुकीत पंचायत समितीच्या 10 गणापैकी शिवसेना 7, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1, भाजपा 1 असे बलाबल होते. तर 5 पैकी 3 जिल्हा परिषद गटात शिवसेना, 1 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस असे बलाबल होते. आता अनेक समीकरणे बदलली आहेत. हिरामण खोसकर यांचा आमदारपदावर विजय, माजी आमदार निर्मला गावित यांचे शिवसेनेतील पक्षांतर, सध्याची शिवसेनेतील पडलेली फूट, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचा शिंदे गटातील प्रवेश, भाजपाचे वाढलेले प्राबल्य, बदललेले सरकार, सोसायट्यांच्या झालेल्या निवडणुका, लोकनियुक्त सरपंच अशा अनेकानेक महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. सर्व गट आणि गणांच्या निवडणुकीत प्रभावीपणे ह्या घडामोडी जय पराजयाला कारणीभूत ठरणार आहेत. यासह आगामी काळात राजकीय पक्षांच्या आघाड्या, युती, मैत्रीपूर्ण लढती वगैरे सुद्धा महत्वाचे ठरेल. मागील पराभवांचा वचपा काढण्यासाठी टपून बसलेल्या लोकांचा सुद्धा संभाव्य उमेदवारांना सामना करावा लागेल. मात्र यासाठी अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल.
.