भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
बहुप्रतीक्षा करायला लावणारी नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया अखेर मार्गी लागली. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन सुरुही केले. संभाव्य उमेदवार कामाला लागून सोशल मीडियावर चांगलीच धूम सुरु झाली. निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा सुरु होऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु झाल्या. मात्र नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीला आणि निघालेल्या आरक्षणाला मोठे विघ्न येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे निवडणुका रद्द होऊन पुढे ढकलण्याची प्रक्रिया आणि नव्याने राजकीय आरक्षण काढावे लागणार आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजणार आहे.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी दि. २९ ला मालेगाव दौरा असून ह्यावेळी आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत मालेगाव जिल्हा निर्मिती करण्याची अधिकृत घोषणा होऊ शकते असा अनेकांचा अंदाज आहे. अशी घोषणा झाल्यामुळे संभाव्य मालेगाव जिल्ह्यातील तालुक्यांच्या पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषद गटांचे आरक्षण रद्द होऊन नव्याने ही प्रक्रिया करावी लागेल. याचा मोठा परिणाम नाशिक जिल्हा परिषदेवर होणार असल्याने सगळे मुसळ केरात जाऊ शकते. इगतपुरीसह जिल्ह्यात काढलेले आरक्षण वाया जाण्याची यामुळे शक्यता वाढते. परिणामी निवडणुका पुढे ढकलल्या जातील आणि आरक्षण सुद्धा नव्याने काढावे लागेल. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आढावा बैठकीत होणाऱ्या निर्णयावर निवडणुका अवलंबून असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.