
कवी – प्रमोद चिंचोले, गटशिक्षणाधिकारी नांदगाव
चला गड्यांनो तीळगुळ वाटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
तिळाची स्निग्धता, गुळाचा गोडवा
आयुष्यातले संपवू सारे अनूभव कटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
वाणीत मधूरता,मुखावरी प्रसन्नता
आपुलकीची उधळण स्नेहाने नटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
तिळाचे लाडू सोबत हलव्याचे दाणे
मधूर नात्यासाठी मनामनात दाटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
पतंगासम घेता उंच उंच भरारी
सुखाच्या दोऱ्याने दुःखाला काटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
आठवणींच्या हिंदोळ्यात वरवर जाऊ
हळव्या मनाला आठवणीत खेटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
देऊ थोडा ढिल, काढू मनातले पिळ
तिळगुळासारखे नात्यांना चिकटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…
चला गड्यांनो तीळ गुळ वाटू
थोडा वेळ काढून माणसांना भेटू…