लेखन : निलेश गौतम, जेष्ठ पत्रकार डांगसौंदाणे ( सटाणा )
किती भयानक हो हे…! आता तरी सुधरा, जरा बोध घ्या. ग्रामीण भागात थेट ऍम्ब्युलन्स स्मशानात जातांना आपण कधी पाहिली होती का ? नाही ना..! मग आता ते ही विदारक चित्र आपल्याला पाहण्याची वेळ येऊ लागली आहे. आपल्या खेड्यात किती छान आणि चांगली संस्कृती होती. एखादं दुसरं कोणी गेलंच तर सगळं गाव जमा व्हायचं. त्या कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्यासाठी सर्वजण प्रेमाने मदत करायचे. एरवी सांत्वनपर अंतिम संस्कार हे गावातील सर्वच लोक त्या कुटुंबावर कुठलाही ताण येणार नाही अशा पद्धतीने पार पाडायचे. हीच खरी आपली ग्रामीण संस्कृती होती. मात्र आता सर्वच चित्र बदलायला लागले आहे. ज्याचं जातं त्यालाही काही करता येत नाही. अन कोणी कितीही जवळचा असला तरी तो जवळ येत नाही. हे कटू वास्तव आहे मात्र ते आपल्याला नाईलाजाने स्वीकारावे लागत आहे. अनेकांचे घरातील कर्ते पुरुष गेलेत. अनेकांचा आधार गेला. कोणाची आई गेली, कोणाचा बाप गेला, कोणाची पत्नी गेली तर कोणाचा कर्ता मुलगा गेला. किती किती भयानक आहे हे सगळं ??? अनेक कुटुंबे उजाड झाली. दुःख आभाळापेक्षा कितीतरी मोठे आहे. किती किंमत आहे जिवंत जीवाला ? तोच जीव ज्यावेळेस मृत होतो त्यावेळी काय होते त्या देहाचे ? हे भयानक चित्र आपण सर्व ठिकाणी बघत आहोत, ऐकत आहोत. मात्र त्याच्यातून आपण काय बोध घेतो हे मात्र सर्वांचे मन सुन्न करणारे आहे. सगळीकडे खूप वाईट परिस्थिती आहे. ज्याच्या घरातील जातं आहे त्यालाच सर्व व्यवस्था करावी लागत आहे. त्यालाच त्याची धावपळ करावी लागत आहे. अनमोल जीवन मातीमोल बनत आहे. आज ठणठणीत असलेला व्यक्तीचे उद्या काय होईल या भीतीने जीवन जगत आहे. नको ते विचार घेऊन मानव मानवापासून दूर जात आहे. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. नको त्या परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर सध्या तरी बाहेर पडणे धोक्याचे आहे. कोरोनाने काही होत नाही हे सर्वात पहिले डोक्यातून काढून टाका. ज्याला झाला त्याला जाऊन विचारा. लोक काय म्हणतील म्हणून दुर्लक्ष करू नका. आता आपण आपल्या सोबत मृत्यूला घेऊन फिरत आहोत, असं समजा थोड्या दिवस. घरातल्यांचा विचार करा घरातच थांबा. ”जान है तो जहान है ” म्हणत स्वतःला सावरा, बाहेरील गर्दी टाळा आपल्सासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल प्रशासनाच्या लोकांना देव माना. त्यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी देवाला साकडे घाला. आजच्या संकटग्रस्त काळात तेच आपले देव आहेत. काळजी करा. प्रशासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करा. अन्यथा येणाऱ्या काळात ऍम्ब्युलन्सचा सायरन आणि आपली रोजच मुलाखत होईल हे लक्षात असु द्या. बाहेर पडू नका आणि इतरांना ही समजून सांगा. जे समजावण्याच्या पलीकडे आहेत त्यांच्या पासून दोन हात दूर रहा. शेवटी ज्याचे त्याचे नशीब…!
गरज समाज प्रबोधनाची.
गरज कोरोना आटोक्यात आणण्याची.
चला सर्व मिळुन करूया
प्रशासनाला सहकार्य
विशेष संपादकीय : कोरोना पॉझिटिव्ह अत्यवस्थ रुग्णांवर “पॉझिटिव्ह” विचारांचा उतारा