भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा बिगुल वाजला आहे. इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षण सोडत काढतांना ओबीसी वगळून आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार आरक्षण सोडत काढणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील आरक्षणावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार १३ जुलैला आरक्षण सोडत कार्यक्रम होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकंदरीत सर्वांगीण विचार करता सप्टेंबर महिन्याच्या १० तारखेनंतर केव्हाही निवडणुका होणार असल्याची दाट शक्यता आहे. आरक्षण सोडत निघणार असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष सोडतीकडे लागले आहे.
इगतपुरी तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे 10 गण असून इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. ओबीसी आरक्षण नसल्याने अनेकांचा हिरमोड होणार असला तरी महिलांसाठी गट किंवा गण आरक्षित झाला तर काय करावे? अशी विवंचना सुद्धा निर्माण होणार आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे राजकीय भविष्य ठरवणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण आणि महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती गणासाठी तहसीलदार कार्यालयात १३ जुलैला आरक्षण सोडत काढली जाईल. सोडत प्रक्रियेवर 15 ते 21 जुलैपर्यंत सूचना आणि हरकती मांडता येणार आहेत. सर्व प्रक्रियेनंतर 2 ऑगस्टला आरक्षण अंतिम केले जाईल. यानंतर लगेचच मतदार याद्यांचा कार्यक्रम होऊन निवडणुकांच्या तयारीसाठी आयोगाकडून निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.