रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना ओहळातून व चिखलातून काढावी लागतेय वाट : ही तर इगतपुरी त्र्यंबकच्या विकासाचे वाभाडे काढणारी घटना – लकीभाऊ जाधव

इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शिक्षणाने त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र ह्या योजनांची अंमलबजावणी पाहिजे तशी होत नाही. कोट्यावधी रुपयांच्या विकासाच्या नावाने धिंढोरा पिटणारे लोकप्रतिनिधी आदिवासी नागरिकांच्या समस्या सोडवत नसल्याचे दिसते. इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास सुरु आहे. रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहळातून व चिखलातून वाट काढावी लागते. ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात. इगतपुरी त्र्यंबक तालुक्याच्या विकासाचे वाभाडे काढणारी ही घटना असल्याची संतप्त प्रतिक्रिया अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून एका आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तरीही शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी ढिम्म असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी भाम व भावली धरणाचे जल पूजन केले. मात्र आठ किमी वर असलेल्या या वाडीला भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेण्याचे साधे कष्ट सुद्धा घेतले नाही असेही लकीभाऊ जाधव यांनी म्हटले आहे. दोन वर्ष अगोदर रस्ता मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी मात्र काम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आदिवासी बांधवांना आहे. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले परंतु अजूनही आदिवासीना त्यांच्या मूलभूत गरजांचे स्वातंत्र्य मिळाले नाही. रस्त्याअभावी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात. वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे या आदिवासींच्या नशिबी आलेल्या दुःखद घटना दूर झाल्या पाहिजे. जेणेकरून आदिवासींनाही स्वातंत्र्य असल्याचा अनुभव येईल अशी भावना लकीभाऊ जाधव यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!