इगतपुरीनामा, न्यूज, दि. ७
मुलगी वाचवा मुलगी शिकवा यानुसार मुलींचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी समाजाने आणि पालकांनी प्रोत्साहन द्यावे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काळुस्ते येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करून पुनम अहिरे हिने मंत्रालय कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक भिला अहिरे यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात बलायदुरी येथील प्राधमिक शिक्षक भिला अहिरे, सुनंदा अहिरे यांची मुलगी पूनम हिची मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड झाली. आहे. या यशाबदल तिचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तिने सर्वसाधारण गुणवत्ता यादीत २०७ वा तर ओबीसी मुलींमध्ये राज्यात ५ वा क्रमांक पटकावल. त्यामुळे तिला ओबीसी मुलींसाठी राखीव एकमेव कक्ष अधिकारीपदी वर्णी लागली आहे.
इंजिनीअरिंग नंतर कॅम्पस प्लेसमेंट झालेली असतानाही ती नोकरी नाकारत पूनमने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला होता. गेल्या वर्षी ११ गुणांनी नायब तहसिलदार पदाने तिला हुलकावणी दिली. मात्र अपयशातून धडा घेऊन न खचता कोविड काळात परीक्षा पुढे जात असताना संयम ठेवला. यशह चिकाटीने अभ्यास सुरु ठेवल्याने आपल्याला हे यश मिळाले असे पुनमने सांगितले. पूनमचे आईवडील इगतपुरी तालुक्यात प्राथमिक शिक्षक असून तिचे शालेय शिक्षण इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, घोटी, नाशिकच्या वाघ गुरुजी माध्यमिक विद्यालयात झालेले आहे. उच्चमाध्यमिक शिक्षण केटीएचएम कॉलेजमधून तर क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजनिअरिंग पूर्ण केले आहे. पूनमने स्पर्धा परीक्षा अभ्यासासह पुढील शिक्षणही सुरू ठेवले. मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सेट परीक्षा उत्तीर्ण असून सध्या एमबीए करत आहे.
२०२० च्या राज्यसेवा जाहिरातीत वर्ग १ जागा कमी असल्याने पूनमला वर्ग २ पदावर समाधान मानावे लागले असले तरी वर्ग १ अधिकारी पदासाठी तिचा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी, पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात केली. कोविड काळात घरीच अभ्यासाची तयारी केली. तिला विवेक कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड, सहाय्यक राज्यकर आयुक्त निरंजन कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. संभाजी खैरनार, वडील राज्य पुरस्कार शिक्षक भिला अहिरे, आई सूनंदा अहिरे ह्यांनी तिला पाठबळ दिले. पूनमचे भंडारदरावाडी, काळुस्ते, खंबाळे, घोटी, बलायदुरी येथील ग्रामस्थांनी फोनसंदेशाद्वारे अभिनंदन केले आहे. पूनम यापुढेही समाजातील इतर मुलांना कायम मार्गदर्शन करत राहील असा विश्वास भिला अहिरे यांनी व्यक्त केला.