इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे सर्वांनाच आरोग्याचं महत्वं समजलंय. प्रत्येक जण आपले आरोग्य सांभाळण्याचं आणि फीट ठेवण्याचं प्रयत्न करतोय. आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी तसेच फीट ठेवण्यासाठी विविध पदार्थांचं सेवन केलं जात आहे. कर्टुले ही रानभाजी सुद्धा खवय्यांच्या पसंतीला उतरलेली भाजी आहे. इगतपुरी तालुक्याच्या जंगली आणि डोंगर दऱ्यांमध्ये फक्त पावसाळ्यात आलेल्या वेलीला फळे येतात. घोटी बाजारपेठेत सकाळच्या वेळी कर्टुले विक्रीला येतात मात्र अनेकांचा ह्यावर डोळा असल्याने लगेचच खपूनही जातात. आदिवासी बांधवांना ह्या भाजीमुळे अल्प का होईना पण रोजगार मिळतो. नाशिकच्या बाजारपेठेत बऱ्याच ठिकाणी कर्टुले विकले जातात. गुजरातमधून लागवड केलेले हे कर्टुले आहेत. इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात चौकशी केल्यास ह्या कर्टुले मिळू शकतात. कृषी विभागाच्या रानभाजी महोत्सवात सुद्धा कर्टुले मिळतात.
पावसाळ्यात काही विशिष्ट रानभाज्या बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे कर्टुले. कुठलेही रासायनिक खत, कीटकनाशक न वापरता फक्त जंगलात उगवलेल्या वेलीवरून कर्टुले मिळतात. त्यामुळे ह्या भाजीला खूप महत्व आहे. कर्टुले सेवनामुळे रोगप्रतिकार मजबूत होतेच. सोबतच ताकदही वाढण्यास मदत होते. तसेच ही भाजी अनेक रोगांवर गुणकारक आहे. या भाजीचे नेमकं काय काय फायदे आहेत, हे जाणून घेऊयात.
कर्टुल्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, बी1, बी2, बी3, बी 5, बी6, बी9, बी12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी 2 आणि 3, व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक यासारखे पोषक आणि गुणकारी तत्व आहेत. म्हणजेच या भाजीच्या सेवनानंतर अनेक फायदे मिळतील.
कर्टुले या रोगांवर आहेत गुणकारी
कर्टुले आपलं विविध प्रकारच्या रोगांपासून दूर ठेवतं. इतकेच नाही तर, यामुळे अनेक रोगांपासून सुटकाही होते. आयुर्वेदात कर्टुल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. डोकेदुखी, केस गळती, कानदुखी, खोकला, पोटदुखी, मूळव्याध, कावीळ, डायबिटीज, लकवा, सर्पदंश, कॅन्सर, उच्च रक्तदाब, यासारख्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर ही भाजी गुणकारी आहे. केवळ ही भाजीच गुणकारी आहे, असं नाहीये. कर्टुल्याची पानं, फूल, मूळांचा वापर करुन औषध तयार केलं जातं.