लेखन : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
सखुबाईची हो ऐका कहाणी !
प्रेमळ बोलणं साधी रहाणी !!
गांव सरपंच सखुबाई म्हणी !
घरोघरी देऊ पिण्याचे पाणी !!
सखुबाईची हो तऱ्हाच न्यारी !
गावात तिचा हो रुबाब भारी !!
सकाळी उठता राम प्रहारी !
कपाळी कुंकू मळवट भरी !!
सखुबाई करे नित्य न्याहरी !
मिरची ठेचा बाजरी भाकरी !!
समस्या घेऊन येती गांवकरी !
लोकांचा घरात दरबार भरी !!
मंथन करती सारे गांवकरी !
गावाचा करु विकास भारी !!
विकास योजना देऊ घरोघरी !
निस्वार्थी सेवेचा संकल्प करी !!
सखुबाईचा गांव आदर करी !
सखुबाईने ध्यास घेतला उरी !!
शिक्षित करु साऱ्या पोरं पोरी !
ज्ञानाचा दिवा लाऊ घरोघरी !!
निरोगी ठेवण्या सारे गांवकरी !
गावात काढती शिवार फेरी !!
स्वच्छता दूत फिरे दारो दारी !
आरोग्य संदेश देती घरोघरी !!
सखुबाई म्हणे अहो गांवकरी !
गांव करील ते राव काय करी !!
गावाचा विकास करण्या खरी !
घराचे-पाण्याचे कर सारे भरी !!
गावात असती हुशार शेतकरी !
शेतकऱ्यां करु आता व्यापारी !!
शेतमाल धान्याची थांबवु उधारी !
कष्टकऱ्या भावाला देऊ उभारी !!
ज्ञानाचा महिमा सांगू दारोदारी !
कमी करु मानव विकास दरी !!
सखुबाई होता गांव कारभारी !
गुटखा दारूबंदी जागर करी !!
सखुबाई असे गांव मानकरी !
भरजरी पदर घेई डोक्यावरी !!
तिरंगा झेंड्याला सलाम करी !
देश अभिमान जागवती उरी !!
व्यसनानं वाया जाता पोरं पोरी !
सखुबाई गावात दारुबंदी करी !!
सखुबाई नावाची दहशत भारी !
नांदती सुखशांती गावात खरी !!
मैदानी खेळांना देऊन उभारी !
कसदार पिढी घडवती खरी !!
सखुबाई जरी असती हो नारी !
दमदार सरपंच म्हणे गांवकरी !!
( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )