सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहितेची रेल्वेखाली आत्महत्या

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळुन आज रेल्वेखाली आत्महत्या केली. याबाबत विवाहीतेच्या वडीलांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सासरच्या लोकांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार घोटी शहरातील विलास वैभव लाड याच्याबरोबर २ वर्षापुर्वी नाशिक येथील रतन रामनाथ सोनार यांची मुलगी अक्षदा रतन सोनार ( वय २२ वर्ष ) हिचा विवाह संपन्न झाला होता. आज दि. २४ जुलै रोजी अक्षदाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याने तिच्या वडीलांनी आपल्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत म्हटले आहे की, पहीले ६ महीने अक्षदाला चांगले वागवले, त्यानंतर फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन ३ लाख रुपये आणावे म्हणुन तिचा छळ सुरु केला. सासरच्यांनी वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करत तिचा छळ केल्याने तिने आत्महत्या केली. याबाबत पोलीसांनी अक्षदाचा पती वैभव लाड, विलास लाड, ज्योती विलास लाड, मोनु विलास लाड यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे करीत आहेत.