मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135
शालेय शिक्षणाच्या उंबरठ्यावरचा एक महत्त्वाचा थांबा म्हणजे दहावीच्या परीक्षेनंतरचा काळ. कला, वाणिज्य आणि शास्त्र या पारंपारिक शाखेच्या पलीकडेही अनेक वाटा आहेत. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज बनली आहे. आयटीआय, तंत्रनिकेतन ह्या आज रोजगाराभिन्मुख तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. यातील अभ्यासक्रम हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी चालना देणारे आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये व्यवसायासाठी फार पोषक वातावरण तयार होत आहे. व्यवसाय म्हणजे विक्री हा एक नियम लक्षात ठेवा. युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारही स्टार्टअप इंडिया, कौशल्य विकास सारख्या योजनांमधून प्रोत्साहन देत आहे.
युवकांनी प्रथम व्यवसायाची योजना तयार करावी. व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे. व्यवसायासाठी योग्य जागेची निवड करावी. व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाची जुळवाजुळव करावी. व्यवसायासाठी लागणारा आवश्यक तो सरकारी परवाना घ्यावा. अनुभवी व्यावसायिकाचे मार्गदर्शन घेऊन व्यवसायाचा श्रीगणेशा करावा. अधिक माहितीसाठी शासकीय संकेतस्थळ https://startupindia.gov.in याचा वापर करावा.
सध्या इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण अनेक खासगी संस्थेत देखील उपलब्ध आहे. अनेकांनी हे ज्ञान दुसऱ्याच्या दुकानात काम करून, निरीक्षण करून मिळविले आहे. आजही अश्याच प्रकारे इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दुरुस्तीचे काम शिकण्याकडे युवकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कौशल्य असलेल्या या व्यवसायात चांगली कमाई मिळत असल्याने अनेक युवक याकडे वळत आहेत. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर देत इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दुरुस्तीचे हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे.
आयटीआयमधील इलेक्ट्रिशियन आणि तंत्रनिकेतनमधील इलेक्ट्रिकल या अभ्यासक्रमाला आजही चांगली मागणी आहे. घरातील विजेची देखभाल व दुरुस्तीची कामे इलेक्ट्रिशियन करतात. विजेवर चालणारी यंत्रे जसे की पंखा, फ्रीज, टीव्ही, इलेक्ट्रिक मोटार, मिक्सर, इस्त्री अशा अनेक वस्तूंची देखभाल, विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिशियन करतात. तसेच घरातील वायरिंगची फिटिंग त्यांची दुरुस्ती व देखभाल, कंपनीतील असंख्य मशिनरीची देखभाल करण्यासाठी आणि खासगी तसेच सरकारी कंपन्यात इलेक्ट्रिशियनची आवश्यकता असते.
इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय हा एक चांगला पर्याय आज उपलब्ध आहे. इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दुकानात प्रामुख्याने विद्युत साधने पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, विविध प्रकारची वायर, स्विचेस, होल्डर, बल्प, ट्यूबलाईट, टू-थ्री पिन, सेल, सेलोटेप, बॅटरी, पंखा, अर्थिंगचे साहित्य, हिटर, फ्युज, इन्व्हर्टर, सिंगल फेज व थ्री फेज मोटार देखभाल व दुरुस्ती व विक्री, सौर उर्जा व सौर उर्जेवर चालणारी विविध यंत्रे यांची विक्री करून युवक ३० ते ४० टक्के नफा कमवू शकतात. तसेच विविध इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री व दुरुस्ती करून ५० ते ६० टक्के नफा कमावता येतो.
इलेक्ट्रिकल दुकान सुरु करण्यासाठी युवक मुख्य रस्त्यालगत किंवा बाजारपेठेत भाडेतत्त्वावर दुकान घेऊन एक ते दोन लाख भांडवलात हा व्यवसाय सुरु करू शकतो. मात्र तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, व्यवसायाची आवड आदींच्या जोरावर या व्यवसायातून दरमहा २० हजार ते ५० हजार रुपये कमाई होऊ शकते.
कोणताही व्यवसाय करणे तसे अवघड नाही. आपली नकारात्मक मानसिकता सोडून आपल्याला आवड असलेल्या व्यवसायास युवकांनी सुरुवात करावी. सुरुवात करा, घाबरू नका कारण व्यवसाय करणे बिलकुल अवघड नाही.