अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विचार मंथन बैठकीत निर्णय
ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
त्र्यंबकेश्वर येथे मराठा धर्मशाळेच्या आवारात अखिल भारतीय वारकरी मंडळाची विचार मंथन संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष ह. भ. प. निवृत्ती महाराज रायते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष शिवाजी कसबे यांनी नियोजन करून बैठक पार पाडली.बैठकीत सुरवातीला वारकरी मंडळीचे श्रद्धास्थान असलेले ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना अज्ञात स्थळी बंदिस्त केल्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून निषेध नोंदवला. गत वर्षात वैकुंठवासी झालेल्या वारकऱ्यांना यावेळी श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करून नियोजन करण्यात आले. यामध्ये गावातील कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या कोविड योद्धयांचा वारकरी मंडळाच्या माध्यमातून योग्य तो सन्मान आणि सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. भजनी मंडळातील गायक, वादक यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
यामुळे कोरोनाकाळात खंडित झालेली वारकऱ्यांची भावभक्ती पुनर्जीवित करण्यासाठी गावोगावी हरिनाम सप्ताह ह्या पवित्र कार्यक्रमास सुरवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानुसार सर्व तालुक्यातील वारकरी मंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज रायते, भास्कर महाराज रसाळ, निवृत्ती महाराज चव्हाण, शारदाताई जाधव यांनी आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून, समाजाच्या हिताचे आहे. धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे सर्वोतोपरी लागणारी मदत करण्याचा शब्द दिनकर अण्णा पाटील यांनी दिला. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज रायते, दिनकर अण्णा पाटील, सुरेश तात्या गंगापुत्र, भास्कर महाराज रसाळ महाराज, निवृत्ती महाराज चव्हाण, शारदाताई जाधव, त्र्यंबक तालुकाध्यक्ष शिवाजी कसबे, शिवाजी मेढे, गोकुळ महाले, किरण चौधरी, रावसाहेब कोठुळे, तानाजी कड, पाडुरंग आचारी, ज्ञानेश्वर मेढे पाटील, सुनील बोडके पाटील आदी उपस्थित होते.