
इगतपुरीनामा न्यूज – शेतीशाळा कृषी विस्ताराचे सुलभ आणि प्रभावी माध्यम असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी इगतपुरी रामदास मडके यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यात विविध पिकांच्या शेतीशाळा राबविल्या जात आहेत. त्यानुसार शेणवड बुद्रुक येथे तालुका कृषी विभाग आणि ‘आत्मा’ अंतर्गत टोमॅटो पिकाची शेतीशाळा राबवण्यात येत आहे. यामध्ये टोमॅटो उत्पादक ३० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना दर १५ दिवसांनी लागवड ते काढणीपर्यंत पोस्टरद्वारे, रोग किडींचे कॅलेंडर, छायाचित्रे, प्रत्यक्ष प्लॉट निरीक्षणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विषयक मार्गदर्शनातून अधिकाधिक उत्पन्नवृद्धी साधता येते. शेतीशाळांमध्ये तज्ज्ञ कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दिले जात आहे. ह्याचा इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले आहे.
मंगळवारी शेणवड बुद्रुक येथे आत्मा अंतर्गत टोमॅटो पिक शेतीशाळेचा तिसरा वर्ग आयोजित करण्यात आला होता. कृषि पर्यवेक्षक किशोर भरते यांनी टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन कसे घेता येईल, शेतकऱ्यांनी मागील हंगामात वापरलेली खते, औषधे, किडी व रोगाचा प्रादुर्भाव याबाबत वेळापत्रक व नोंदी ठेवाव्यात आदीबाबत मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक मोहिनी चावरा यांनी मागील आढावा घेतला. कृषि सहाय्यक शिवचरण कोकाटे यांनी जमिनीची मशागत, टोमॅटोचे अन्नद्रव्य व्यवस्थापन व मल्चिंगचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सहभागी शेतकऱ्यांनी टोमॅटो प्रात्याक्षिक प्लॉटमध्ये पिक परिसंस्था निरिक्षणे घेतली. यावेळी उपसरपंच कैलास कडु, कृषि सहाय्यक पांडुळे व प्रगतशील शेतकरी मिलिंद शिंदे, कोंडाजी गिळंदे, समाधान गिळंदे, कारभारी कोकाटे, शिवाजी शिंदे, निवृत्ती कोकाटे, मुक्तीराम कोकाटे, भरत कडु, संदिप शिंदे, काळु दिवटे, अंकुश गिळंदे, तानाजी गिळंदे, हरिश्चंद्र गिळंदे, युवराज पोरे, निवृती गिळंदे, भाऊसाहेब कोकाटे, नामदेव गिळंदे आदी उपस्थित होते.