निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
तलाठी संवर्गाबाबत अवमानकारक शब्दप्रयोग केल्याने संतप्त तलाठी संघटनांनी आज बुधवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे तलाठ्यांनी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अधिकार देखील तहसीलदारांकडे सुपूर्द करून आंदोलनाची हाक दिली. इगतपुरी तालुका तलाठी संघाच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. काम बंद आंदोलन करून सर्व कामावर बहिष्कार टाकला आहे.
भूमिअभिलेख समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्याविषयी अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी राज्यातील तलाठ्यांनी आंदोलन पुकारले आहे. जगताप यांची तातडीने बदली न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील तलाठी संघ आंदोलनात सहभागी झाले असून जिल्हा संघाच्या आदेशान्वये इगतपुरी तालुका तलाठी संघाने डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तहसीलदारांकडे परत केले आहेत.
नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामांवर तलाठी संघटनांनी बहिष्कार टाकला आहे.
तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी तालुका तलाठी संघ अध्यक्ष संदीप कडनोर, सरचिटणीस कैलास आहिरे, राम तौर, शरद बेंडकोळी, मनोज मोरे, सचिन कराटे, सचिन कल्याणकर, मंडळ अधिकारी सुयोग्य वाघमारे आदी उपस्थित होते.