इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
इगतपुरी तालुक्यातील धानोशी या आदिवासी वस्तीवर ऐन उन्हाळ्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. विंधनविहिर, कूपनलिका, बोअरवेल विहिरी या दिवसांत कोरड्याठाक पडतात. माजी सरपंच मधुकर बांबळे यांच्या मालकीच्या विहिरीवरून डोक्यावर लांब अंतरावरून पिण्यासाठी पाणी वाहून आणताना महिलांची मोठी कसरत होत असे. बोअरवेलवर आधारित योजनाही पाण्याअभावी अपयशी ठरल्याने समस्या निर्माण झाली होती. ही समस्या माजी सरपंच मधुकर बांबळे, गणपत बांबळे, पोपट बांबळे, लक्ष्मण बांबळे यांसह महिला वर्गाने पेहेचान प्रगती फाउंडेशनकडे मांडली. त्यावर उपाय म्हणून पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध करून दिल्यास आमची समस्या दूर होईल असे महिला वर्गाने सांगितले. त्यावर तात्काळ पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून व ललिता गोपी डीडवाणी यांच्या सहकार्याने पाण्याची टाकी उपलब्ध झाली.
धानोशी गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रकारचा त्रास सोसावा लागत होता. यामुळे महिला वैतागल्या होत्या. लांबून पाणी वाहण्यामुळे शारीरिक व्याधीही जडल्या होत्या. पेहेचान प्रगती फाउंडेशन आणि ललिता गोपी डीडवाणी यांच्या मदतीने महिलांचा पाणी प्रश्न मिटला आहे. सर्वांचे गावाच्या वतीने आभार मानतो.
- मधुकर बांबळे, माजी सरपंच
डोक्यावर उभ्या चढाने पाण्याचे हंडे वाहण्याच्या कठीण कामातून मुक्तता झाल्यामुळे महिला आनंदी झाल्या आहेत. येथील महिला भगिनींनी पेहेचान प्रगती फाउंडेशन व ललिता गोपी डीडवाणी यांचे आभार मानले आहेत. पाण्याच्या टाकीच्या लोकार्पणाप्रसंगी माजी सरपंच मधुकर बांबळे, गणपत बांबळे, माजी सरपंच यशवंत केवारे, पोपट बांबळे, चंदर जाधव, माजी सरपंच रमेश जाधव, लक्ष्मण बांबळे, तुकाराम बांबळे, भोरु जाधव, अक्षय जाधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दूर अंतरावरून डोक्यावर हंडा वाहून आणण्याचा व विहिरीतून पाणी ओढण्याच्या त्रासातून मुक्तता झाल्यामुळे धानोशीतील महिलांनी पेहेचान प्रगती फाउंडेशन व ललिता गोपी डीडवाणी यांचे आभार मानले. माजी सरपंच मधुकर बांबळे हे गेली अनेक वर्षे स्वतःच्या मालकीच्या विहिरीचे पाणी धानोशी साठी उपलब्ध करून देत आहेत त्यांचेही सर्वांनी आभार मानले.