
इगतपुरीनामा न्यूज – नासिक मुंबई महामार्ग ह्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. खड्डेच खड्डे पडले असल्याने ह्या रस्ता कसा म्हणावा असा प्रश्न पडतो आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार आणि वाहनधारक पडून अपघातात जखमी झाले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ९ ऑगस्टपर्यंत युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी करून द्यावी अन्यथा ९ ऑगस्ट क्रांतीदिन ह्या दिवशी महामार्गावर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांनी दिला आहे. लोकांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या गेंड्याची कातडी पांघरणाऱ्या यंत्रणेला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. प्रशासनाने रस्ता दुरुस्तचे काम हाती घेतले असले तरी अत्यंत संथ गतीने काम सुरु असल्याने रस्त्यांचे काम पूर्ण होण्यास काळ लोटतो की, काय असे वाटू लागले आहे. दुरुस्तीचे काम कासवगतीपेक्षाही संथ गतीने सुरु असून या मार्गाने जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. काही ठिकाणी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनधारक या भागात येत नाहीत. परिणामी वाडीवऱ्हे, गोंदे, पाडळी येथील व्यावसायिक नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आहे. वाहनांच्या रांगा लागल्या असून सध्या वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.