इगतपुरीनामा न्यूज – सध्या सुरु असलेल्या पावसामुळे पुनर्वसित दरेवाडी येथील घरांमध्ये पाणी घुसले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बाधित कुटुंबांना अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीचे पुनर्वसन नवीन जागेत गेल्या पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा करण्यात आली नाही. ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून सतत पुनर्वसन विभाग व पाटबंधारे विभाग यांच्याकडे पाठपुरावा करताहेत.या ठिकाणी मातीचा भराव करून कालव्याला बांधकाम करावे. भिंत टाकावी. त्या ठिकाणी शाळा इमारत, सामाजिक सभागृह, अंगणवाडी इमारत व्हावी आदी मागण्या पाच वर्षापासून सतत करतात. मात्र अद्यापही याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. दरवर्षी पाऊस आला की या लोकांना येथून बळजबरीने हलवले जाते. एक रात्र कुठेतरी नेऊन ठेवले जाते. मात्र पुन्हा त्याच परिस्थितीला या ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. रोजचं मरण मरण्यापेक्षा आम्ही जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी दरेवाडी येथील सर्व ग्रामस्थ जलसमाधी घेऊन आमचे जीवन संपवणार आहोत. रोज मरण्यापेक्षा एकदाच मरून गेलेले कधीही चांगले असा संतप्त इशारा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष गणपत गावंडा आदी ग्रामस्थांनी दिला आहे. दरेवाडी येथील आदिवासी नागरिकांनी जलसमाधी घेण्याचा घेतलेला निर्णय सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत योग्य आहे. ह्या लोकांना संपवण्याचे प्रशासनाचे कारस्थान असून जलसमाधी घेऊन पुनर्वसन झालेल्या कुटुंबांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे आम्ही शासनाचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group