

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
एकीकडे कोविड संसर्गाने सर्वांचेच धाबे दणाणले असतांना आणि सर्वच घटक कोविड पासून वाचण्याचा प्रयत्न करतांना दिसत असले तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्य लोक मात्र अजूनही कमालीच्या बेफिकीरीने वागतांना दिसत आहेत. असेच चित्र मंगळवारी घोटी बाजारपेठेत पाहायला मिळाले असून प्रचंड गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. कोविड नियमांची ऐसीतैसी झाल्याचेही दिसून आले. सोबतचे फोटो पाहिल्यानंतर घोटी शहराची आणि पर्यायाने इगतपुरी तालुक्याची किती गंभीर अवस्था होऊ शकते याची नुसती कल्पना केली तरी धडकी भरल्याशिवाय राहत नाही.
घोटी शहर हे इगतपुरी तालुक्याचीच नव्हे तर राजूर-अकोले पासून जव्हार मोखाडा पर्यंतच्या सगळ्याच गावांची प्रमुख बाजारपेठ आहे. लग्नकार्य, बांधकाम किंवा इतर कुठलीही मोठी खरेदी करण्यासाठी या परिसरात घोटी बाजारपेठेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे शहराचा जनसंपर्क हा केवळ शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यतील काही भागासाठीही ही महत्वाची बाजारपेठ मानली जाते. सद्यस्थितीत कोविड संसर्गामुळे उदभवलेली परिस्थिती आणि वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण लॉकडाऊन न करता सकाळी 11 पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवली आहे. मात्र हे करत असतांना कोविड संबंधी सगळ्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत घोटी शहर मात्र या नियमाला अपवाद ठरतांना दिसत असून कोविड संबंधी कुठलेही नियम पाळतांना दिसत नाही. वारेमाप होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला असल्याचे भयंकर चित्र सध्या घोटी शहरात दिसून येत आहे.
आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यात आणि पर्यायाने घोटी शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या अत्यल्प होती. मात्र दुसऱ्या लाटेत ही परिस्थिती गंभीर असून शहरी भागापेक्षा कितीतरी अधिक पटीने ग्रामीण भागात शिरकाव झालेला दिसून येत आहे. इगतपुरी तालुकाही त्यातून सुटला नाही. दुसऱ्या लाटेत खेडोपाडी मोठ्या संख्येने कोविड रुग्ण आढळून आले आहेत, ग्रामीण भागाची परिस्थिती शहरी भागापेक्षा बिकट झाली आहे, असे असतांना घोटीसारख्या बाजारपेठा कोरोना सुपर स्प्रेडर्स ठरत आहेत. सुदैवाने गेले काही दिवस कोरोना रुग्णांची तालुक्यातील आकडेवारी कमी होतांना दिसत असली तरी घोटीसारख्या बाजारपेठेच्या शहरात होणारी ही गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला पुरता बोजवारा पुन्हा तालुक्याला कोविडच्या खाईत लोटतो की काय अशी भिती वाटू लागली आहे.
दरम्यान आजपासून राबवल्या जाणाऱ्या लॉकडाऊनच्या नव्या नियमावलीमुळे घोटी शहरातली गर्दी ओसरणे अपेक्षित आहे, मात्र तसे झाले नाही तर घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने असे झालेच तर अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आधीत त्रस्त झालेल्या तालुक्याची परिस्थिती पुन्हा एकदा कोरोना विस्फोटाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवली जाईल हे मात्र नक्की!



