इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे, गोंदे, रायगडनगर ( चिमनबारी ) आदी ठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या वाढला आहे. अचानक ही जनावरे रस्त्यावरून इकडे तिकडे पळत असल्याने वाहनधारकांचा अंदाज चुकतो. यामुळे छोटे मोठे अपघात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. ही मोकाट जनावरे धिम्मपणे महामार्गावर बसून राहत असल्याने वाहतुकीला सुद्धा खोळंबा होत आहे. नियमित प्रवास करणारे वाहनधारक सावध राहत असले तरी नव्याने येणारे वाहनधारक मात्र अचानक गोंधळून जातात. यामुळेच अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे दिसते. पिंपळगाव टोलनाका हद्धीत ही ठिकाणे येत असून हा टोलनाका उपाययोजना करण्याऐवजी दुर्लक्ष करीत आहे. हा प्रश्न अनेक वर्षांचा असून ह्यावर कठोर उपाययोजना कराव्यात, मोकाट जनावरे नियंत्रणासाठी कोंडवाडे उभारावे अन्यथा अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
रात्रीपासून जवळच लष्करी क्षेत्रातून चरून ही मोकाट जनावरे थेट महामार्गावर ठाण मांडून बसतात. त्यांच्यामध्ये मस्ती असल्याने ती जनावरे अचानक इकडे तिकडे पळतात. नाशिक आणि इगतपुरी ह्या दोन्ही दिशेच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने ही जनावरे वाढली आहेत. यामुळे ह्या परिसरातून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचा नेहमी छोटा मोठा अपघात होतो. परिणामी जीव धोक्यात घालून वाहने येथून प्रवास करतात. संबंधित प्रशासन मात्र यावर कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याने चिंता वाढली आहे. अपघाताला जबाबदार ठरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त केला नसल्यास झालेल्या अपघातांना जबाबदार धरून टोल प्रशासनावर गुन्हे दाखल व्हावेत अशी प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिली.