इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
दिवाळीच्या सुट्ट्या आणि सहामाही शैक्षणिक सत्राच्या शेवटच्या दिवशी मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना पाटील व शेवाळे परिवारातर्फे व्हेज पुलाव आणि गोड शिऱ्याची छोटी पार्टी देण्यात आली. शिक्षिका माधुरी पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने हे सुग्रास भोजन देण्यात आले. घरोघरी साजरे होणारे लक्ष्मी पूजन, भाऊबीज हे सण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी याप्रसंगी साजरे केले. यावेळी रांगोळ्या, मेहंदी, आकाश कंदील, पणत्या लावण्यात आल्या होत्या.
केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यांनी दिवाळी विषयी विद्यार्थ्यांना सर्व माहिती सांगितली. गणपती, देवीची आरती आणि पूजेचा मान केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर, सरपंच राहूल बोंबले, मुख्याध्यापक चंद्रभागा तुपे, पोलीस पाटील भगवती धात्रक, अनुसया गोऱ्हे यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील यात सहभाग घेतला. पूजेनंतर विविध गाण्यावर डान्स आणि फटाके फोडण्यात आले. यात विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख सहभागी झाले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका सीमा जगताप, शिल्पा आहेर, सोनाली बोडके, सुनीता सोनवणे उपस्थित होत्या. माधुरी पाटील यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश शेवाळे यांनी आभार मानले.