इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
आपल्या येणाऱ्या भावी पिढीला आणि आपल्यालाही सुखाने श्वास घ्यायचा असेल तर हजारोंच्या संख्येने झाडे लावून ती जगवा असे आवाहन श्रमजीवी संघटना-विधायक संसदच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी काही वर्षांपूर्वी केले आहे. त्यानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील गाव समिती आयोजित “सन्मान दिन” संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात उपयुक्त झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांनी केले.
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांतर्फे पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ह्या कार्यक्रमात सर्वांनी पर्यावरण संगोपन ह्यावरवर भर दिला. पर्यावरणाबरोबरच मानवाचा समतोल राखण्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या थांबवून महिलांना समाजामध्ये स्थान मिळाले पाहिजे. समाज परिवर्तनाच्या कामात प्रशंसेपेक्षा आयुष्यभर टीकाच अधिक वाट्याला आली. त्यामुळे गुणांपेक्षा टीकाकारांच्या टीकेमुळेच आमची कामाची प्रेरणा अधिक वाढत गेली अशी प्रेरक आठवण श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी उपस्थितांना सांगितली.
कोरोना काळात श्रमजीवी संघटनेला मदत करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान स्मृती म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, पोलीस हवालदार सचिन देसले, विजय रुद्रे, प्रकाश शेळके, मुख्याध्यापक एकनाथ ठाकूर, मुख्याध्यापिका प्रतिभा गोपाळे, किशोर कोळी, गौतम गंभीरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी १० कातकरी कुटुंबांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, तानाजी कुंदे, सुनील लोहारे, शांताराम भगत, विजय मेंगाळ, महिला प्रमुख लता मेंगाळ, मथुरा भगत, गणपत गावंडे आदी उपस्थित होते.