
इगतपुरीनामा न्यूज, दि. 10
इगतपुरी तालुक्यातील टाकेद जिल्हा परिषद गटातील विविध महत्वाच्या प्रश्नांवर शिवसेना राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव शिवराम झनकर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी संवाद साधला. टाकेद गटातील पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा हा अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता शासनाच्या हलगर्जीपणामुळे खड्यांसह शेवटची घटका मोजत आहे. ह्या भागातील नागरिक शासनाच्या कारभाराला कंटाळले असून त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या रस्त्याची दसरा दिवाळीपूर्वी दुरुस्ती आणि लगेचच नव्याने रस्त्याचे काम करण्याबाबत खंडेराव झनकर यांनी ना. अंबादास दानवे यांना साकडे घातले. ना. दानवे यांनी अशा गंभीर प्रकरणी विधानपरिषदेच्या सभागृहात शासनाला जाब विचारू असा शब्द दिला. फळविहीरवाडी येथील बंधारा ढगफुटीसदृश्य पावसाने वाहून गेला. यामुळे ह्या भागातील शेकडो हेक्टर आदिवासी बांधवांच्या जमिनीतील उभे पीक वाहून गेले आहे. यासह टाकेद जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महत्वाच्या विषयावरही शिवसेना राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव झनकर यांनी विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. महसूली यंत्रणेमार्फत टाकेद गटातील सर्व गावांत सरसकट पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देणे आवश्यक असल्याचे श्री. झनकर म्हणाले.
इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी असणाऱ्या कातकरी वस्त्यांचे सर्वेक्षण करून सर्व कुटुंबांना हक्काचे घरकुल बांधून द्यावे, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उन्नती करावी, त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगाराची व्यवस्था करावी. विविध समस्या जाणून घेऊन शासन दरबारी आवाज उठवावा या मागण्या यावेळी खंडेराव झनकर यांनी ना. दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी याप्रश्नी दखल घेण्यात येईल असे सांगितले. ना. अंबादास दानवे यांनी पिंपळगाव मोर रस्ता, फळविहीरवाडी बंधारा प्रकरण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, कातकरी बांधव प्रश्न याबाबत सर्वांगीण माहिती घेऊन शासनाला दखल घ्यायला भाग पाडू असा शब्द दिला. याबाबत खंडेराव झनकर यांनी ना. दानवे यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव शिवराम झनकर, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, टाकेद गटप्रमुख साहेबराव झनकर, भिमराव साबळे, बाळासाहेब घोरपडे, कैलास गाढवे, सुदाम भोसले, शिवाजी काळे, शिवाजी गाढवे, बहिरू केवारे, पप्पू लहामगे आदी शिवसैनिक हजर होते.
