
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथे सद्गुरु सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा व सद्गुरु सच्चिदानंद संत रामदास बाबा या थोर संत महात्म्यांचा २७ वा पुण्यतिथी सोहळा राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील सर्व साधक मायबापांच्या उपस्थितीत पार पडला. या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांसह घोटी नगरीत भव्य पालखी सोहळा पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासोबतच अष्टसात्विक भावाचा, भक्तीप्रेमाचा सुकाळ होण्यासाठी संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा या महात्म्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अध्यात्म क्षेत्रात क्रांती केली. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये श्रीपाद बाबांची शेकडो मंदिरे उभारली गेली आहेत. मात्र तरीही घोटी क्षेत्र ही मुख्य कर्मभूमी असल्यामुळे घोटी तीर्थक्षेत्राला दरवर्षी साधक मायबाप सद्गुरु भेटीसाठी येत असतात. पुण्यतिथीच्या महाआरतीसाठी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष हभप गुरुवर्य बाबुराव बाबा भागडे व गुरुवर्य नामदेव आप्पा बिलाडे यांनी साधकांच्या सोयीसुविधांसाठी विविध विकासकामे करण्यासंदर्भात आमदार महोदयांना विनंती केली. बहुसंख्येने येणाऱ्या साधकांच्या सेवेसाठी श्रीमद् सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट, घोटी बुद्रुकचे सर्व विश्वस्त मंडळ व इगतपुरी तालुका साधक परिवार यांनी अहोरात्र मेहनत घेऊन संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.