इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुक्यातील काननवाडी, वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून प्रत्येकी एक एक रुग्णवाहिका देण्यात आली. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णवाहिका मिळाल्याने नागरिकानी आभार मानले. या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, माजी सभापती गोपाळ लहांगे, सुदाम भोर आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले यांनी कोरोना काळात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांचा सन्मान आमदार खोसकर यांनी केला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष बिन्नर, संगीता बिन्नर, अरुण भोर, शेनवडचे सरपंच श्रीराम बोटे, विजय दराणे, दत्तू जाधव, भास्कर जोशी, रमेश डोके, बळवंता भांगरे, मोनिका बिन्नर, सुदाम करवर, विजय सोपे आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाची शासकीय वाहने जिर्ण झाल्याने खूप मोठी अडचण येत होती. मात्र गोरगरीब रुगणांच्या सेवेसाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळाली. यामुळे रुग्णांना नक्कीच फायदा होईल. आरोग्यदूत आमदार खोसकर यांचे लोकांच्या वतीने आभार मानतो असे बाजार समिती संचालक तुकाराम वारघडे यावेळी म्हणाले.
दुर्गम आदिवासी भागातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या आरोग्य केंद्रात येतात. यामध्ये वाहन अपघात, झाडावरून पडणे, सर्पदंश, साथीचे आजार व प्रसुतीसाठी महिला यांचा समावेश असतो. पुढील उपचारासाठी व गंभीर अवस्थेतील रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात. यासाठी आमदार खोसकर यांच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांनी रुग्णांच्या सेवेबाबत सतर्क राहावे याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी सूचना दिल्या.