भाजपाने वादग्रस्त लोकांना आवर घालून त्र्यंबकेश्वरची शांतता, सामाजिक सलोखा अबाधित राखावा : आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – पोलिसांनी स्थानिक नागरिक, शांतता समिती यांची बैठक घेऊन त्र्यंबकेश्वरचे प्रकरण शांततेने मिटवले असतांनाच पुण्यातील हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे व त्यांचे सहकारी यांनी मंदिर प्रवेशद्वारावर आंदोलन केले. तुषार भोसले यांच्या आक्षेपार्ह विधानाने शांतता भंग, सामाजिक तेढ आणि श्रद्धेच्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडला आहे. भाजपा आमदार नितेश राणे, अशोक उईके यांनी पत्रकार परिषद घेऊन याला पुन्हा फोडणी देत त्र्यंबकसह या भागातील अतिक्रमण काढण्याचे विधान केले आहे. त्यांना या भागातील आदिवासी बेघर करून उध्वस्त करायचे आहे का ? यावेळी भाजपा आदिवासी सेल प्रदेशाध्यक्ष अशोक उईके त्यांच्या बोलण्याला दुजोरा देऊन आदिवासी जन्मतः हिंदू आहे असे विधान केल्यामुळे त्यांच्याबद्धल प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या विधानाचा आदिवासी संघटना, आदिवासी बांधव जाहीर निषेध करत आहे. कलम ३४२ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आदिवासी हा हिंदू नाही. तरीही आ. उईके यांच्या विधानामुळे भाजपाला आणि त्यांच्या नेत्यांना राज्यघटना, न्यायालयाचे निकालच मान्य नाही का ? असा सवाल आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेचे नाशिक जिल्हाप्रमुख दिलीप गांगुर्डे, त्र्यंबक तालुकाप्रमुख अशोक लहांगे, उपाध्यक्ष विलास कोरडे, प्रवक्ते देवा वाटाणे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

त्र्यंबकेश्वर व देवस्थान हे आदिवासींचे आद्यदैवत, त्र्यंबकराज महादेव यांचे असून सामाजिक, सांस्कृतिक, प्रथा, परंपरा, अस्तित्वाशी निगडित देवस्थान आहे. शेकडो वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी व ठाकर समाज या मंदिरात पूजा अर्चा करून मंदिर परिसरासह निसर्गाचे संवर्धन करत आहे. त्याचे सर्व अधिकार हे छत्रपतींच्या काळापासून या दोन्ही आदिवासी समाजाकडेच असून आदिवासी महादेव कोळी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाज हिंदू नाही तरीही आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार इथे घडलेला नाही. ह्या प्रकरणाला धार्मिक रंग देत सामाजिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा काही राजकीय लोकांचा स्वार्थी डाव आहे. आदिवासी क्षेत्रात बेकायदा घुसखोरी करून सामाजिक सलोखा खराब होऊन सामाजिक शांतता भंग झाली आहे. परिणामी पर्यटक, भाविक यांची संख्या कमी झाल्याने आदिवासीच्या दैनंदिन आर्थिक उत्पन्नावर दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजपाने वादग्रस्त लोकांना आवर घालून त्र्यंबकेश्वरची शांतता, सामाजिक सलोखा अबाधित राखावा असेही प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!