इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
मुंबई आग्रा महामार्गावरील घोटीपासून खंबाळे पर्यंत सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. ह्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने आणि सोयीप्रमाणे सुरु असल्याने काही व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. असे असूनही संबंधित ठेकेदार काम अतिशय कासवगतीने करीत असल्याचा फटका वाहनधारक सहन करीत आहेत. मात्र आता ह्याची हद्द झाली असून ह्या मार्गावर खड्ड्यांचे प्रमाण अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतुकीचा खोळंबा सुद्धा होत असून घोटीच्या पुलाच्या कामासाठी लोकांचा बळी देण्याचे षडयंत्र आखले जात आहे का अशी शंका उपस्थित होत आहे. खड्ड्यांची वाढती खोली आणि संख्या पाहता घोटी उड्डाणपुलाच्या संबंधित ठेकेदाराला आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांना खड्डेरत्न पुरस्कार देऊन शालजोडीने पूजा करावी अशी त्रस्त प्रतिक्रिया वाहनधारक देत आहेत. तालुक्यातील लोकप्रतिनिधी याबाबत सोयीस्कर मौन धारण करण्याचा काय अर्थ घ्यायचा असा सवाल सुद्धा उपस्थित होत आहे. ह्या कामाच्या सर्व खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करण्याची तयारी सुरु झाली आहे. ह्या खड्ड्यांचे आकारमान रोजच वाढत असल्याने ठेकेदाराचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल होण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया एका वाहनधारकाने दिली.
घोटी येथून मुंबई आग्रा महामार्गावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु असून हे काम अतिशय संथगतीने करण्यात येत आहे. ऐन पावसाळा सुरु झाल्याने संबंधित ठेकेदाराने पर्यायी मार्ग काढला आहे. ह्या दोन्ही जाणाऱ्या येणाऱ्या मार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. परिणामी सर्वच वाहनधारक मेटाकुटीला आलेले आहेत. लहान वाहनाचे संपूर्ण चाक जाईल एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित ठेकेदार मात्र सुस्त असून लोकप्रतिनिधी सुद्धा मस्तपणे शांत आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघाता होऊन बळी जाण्याची शक्यता आहे. मात्र ह्याचे काहीही सोयरसुतक ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांना नसून उड्डाणपुलासाठी बळी देण्याचे तर षडयंत्र नाही ना अशी शंका उपस्थित झाली आहे. ह्या खड्ड्यांमध्ये लवकरच वृक्षारोपण केले जाणार असल्याचे समजते. यासह उड्डाणपुलाच्या ठेकेदाराला आणि संबंधित लोकप्रतिनिधीला खड्डेरत्न पुरस्कार द्यावा. एकदम खोल आणि अपघातजन्य खड्डे असल्याने ह्याची नोंद गिनीज बुकच्या रेकॉर्डमध्ये घ्यावी अशी उपरोधीक मागणी वाहनधारकांनी केली आहे. संबंधितांवर अनेकांकडून शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.