इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात उच्चतम कामगिरी केली आहे. त्यांची कामगिरी लक्षात घेऊन वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभर दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा होतो. शेतकरी समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे असे स्वप्न वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. त्यासाठी इगतपुरीच्या तालुका कृषी विभागातर्फे 25 जून ते 1 जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात पिकाचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग नियंत्रण, पौष्टिक तृणधान्य महत्व, लागवड तंत्रज्ञान, महिलांच्या चर्चासत्रात विविध प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती, खतांचा वापर, जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन, शेळीपालन, मत्स्य पालनाबाबत माहिती, नावीन्यपूर्ण उपक्रमात पारंपरिक लागवड केलेल्या आंबा बागांचे छाटणीद्वारे पुनरुज्जीवन आदी विषयांवर माहिती दिली जाणार आहे. यासह ऑनलाईन फेसबुक व युट्युबवरसुद्धा कृषी योजनांबाबत माहिती मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी या सप्ताहातील सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी केले आहे.
सध्याच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी या कृषी संजीवनी सप्ताहांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन, पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब केला जाणार आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना भेटून, खते, सुधारित, बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती दिली जाईल. शेतकऱ्यांचे सकल उत्पन्न वाढून शेतकरी संपन्न होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला होत आहे. यामध्ये पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या त्रिसुत्रीचा वापर कृषी विभाग करणार आहे. या सप्ताहासाठी इगतपुरी तालुक्यातील कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील असेही शितलकुमार तंवर यांनी सांगितले.