इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षिकांवर कायमस्वरूपी एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ही कारवाई केली असून यामुळे बेजबाबदार शिक्षकांना चांगलीच अद्धल घडली आहे. शाळेची वेळ होऊनही शाळा उघडली नाही. एकही शिक्षक शाळेवर आले नाही. आदिवासी विद्यार्थी दप्तर घेऊन शिक्षकांची वाट बघत आहेत अशी तक्रार श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी डिसेंबरमध्ये केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रत्ना गहनजी कदम, प्राथमिक शिक्षिका मालती गोविंद पवार, गायत्री अरविंद सावंत या तिघींवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण परिषद 12 वाजता असतांना सकाळी शाळेच्या साडेदहा ह्या वेळेत शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शाळा नसल्याची माहिती देणे आवश्यक होते. मात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात न आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याबाबत कारणे दाखवा नोटिशीला तिघींनी काहीही उत्तर दिले नाही. याबाबत सर्वांगीण चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तिघींवरही एक वेतनवाढ रोखण्याची कडक कारवाई करण्यात आली आहे. मुळ सेवापुस्तकामध्ये कारवाईची नोंद घेण्यात येणार आहे. याप्रकरणामुळे बेजबाबदार शिक्षकांवर चांगलाच दरारा निर्माण होईल असा विश्वास तक्रारदार भगवान मधे यांनी व्यक्त केला आहे.