साजरा करा असाही आगळा पितृ दिन

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे, मानसशास्त्रज्ञ

वडील म्हणजे उंबराचं झाड असतं,
लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं..

आईवडीलांबद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे. दोघेही आपल्या मुलांना वाढविण्यासाठी मोठे करण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात. त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी इच्छा यांना मुरड घालतात. म्हणून आईवडील यांचे ऋण व्यक्त करायला अमेरिकेत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन दिवस निश्चित केले आहेत. मे महिन्याचा पहिला रविवार आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ नावाने साजरा केला जातो. तर वडीलांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर डे’ साजरा केला जातो.

काही लोकांच्या मते सर्वच दिवस सारखेच असतात. मग असे डे ( दिवस ) साजरे करण्याची काय गरज आहे ? असे दिवस साजरे करून आपण या नात्यांमध्ये कृत्रिमता आणत असतो. असाही एक विचार करणारा वर्ग पहावयास मिळतो. खरे तर असे दिवस साजरे करण्यात काहीच वावगे नाही. उलट मानवी नातेसंबंधांना उजाळा देण्यासाठी असे दिवस साजरे करणे आवश्यक आहे. यामुळे नात्यांची विणही अधिक घट्ट विणली जाते. मग तो कोणताही दिवस असो. शिवाय साजरे होणारे हे दिवस कोणत्याही जाती धर्माशी निगडित नसून केवळ मानवी नातेसंबंध दृढ करीत असतात.

व्यक्तिमत्व विकासात आईवडीलांची भूमिका किती महत्वाची आहे हे सर्वांना माहीत आहेच.आई बद्दल सर्वच भरभरून बोलतात, लिहितात. पण वडिलांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. आईची महती सांगणारी अनेक पुस्तके, चित्रपट, कथा, कादंबरी, गाणी, कविता लिहिली गेली आहे. वडिलांबद्दल मात्र असे एकही आठवत नाही. वडील हा घटक सुद्धा तितकाच महत्त्वाचा असून कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. तरीही वडिलांबद्दल साहित्य, कथा, कादंबरी, गाणी, कविता, नाटक यामध्ये महती सांगणारे साहित्य कमीच आहे.

फादर डे अर्थात पितृ दिनाचा इतिहास असा आहे

1909 मध्ये ‘मदर्स डे’ साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आणि त्याच वेळी ‘फादर डे’ साजरा करण्याची प्रेरणाही मिळाली होती. वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरांमधील सोनोरा डॉड या व्यक्तीला तिच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनीच आई प्रमाणे सांभाळले होते. त्यासाठी त्यांनी दुसरे लग्न देखील केले नाही. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी प्रथम फादर डे प्रथम साजरा केला. नंतर 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वूड्रो यांनी फादर डे ला मान्यता दिली. त्यानंतर 1960 मध्ये पहिल्यांदाच जागतिक स्तरावर फादर डे साजरा झाला.

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात आई आणि वडील ह्या दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आईचे कर्तृत्व दिसून येते परंतु वडिलांचे मात्र दिसून येत नाही. आई जर प्रेम संस्कार करत असेल तर वडील शिस्तीचे धडे देत असतात. भविष्याच्या दृष्टीने आपल्या मुलांना घडवित असतात. आपली चिमुकले हात धरून चालायला शिकवतात.आपल्याला मिळणारे यश लोकांना अभिमान सांगणारे वडीलच असतात, इतकेच काय आपल्या उत्तुंग भरारी आत्मविश्वासाचे पंख देणारेही वडीलच असतात. कुटुंबातील सर्वांचे आधार देणारे बाबा असतात. कुटुंबात येणाऱ्या अडचणी समस्या संकटे यातही आपल्या कुटुंबाला सावरणारे वडीलच असतात.

रोजच्या जेवणाची सोय करणारी आई असते तर आपल्या भविष्याची शिदोरी करणारे वडील असतात. इतिहास सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माता यांनी घडवले परंतु त्यांचे वडील शहाजीराजे यांचीही झालेली फरफट तितकीच महत्त्वाची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.इतकेच काय पुत्र वियोगाने मृत्यू झालेले प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ राजे एक वडीलच होते.

थोडक्यात आई आपल्या मुलांच्या जीवनाची ‘दिग्दर्शक’ असेल तर वडील हे ‘निर्माते’ असतात. त्यांची भूमिका ही पडद्यामागची असते. ते कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करीत असतात. परंतु कधीही त्याची वाच्यता करीत नाही. बरीच मुले आपल्या आईशी मोकळेपणाने बोलतात. परंतु वडिलांशी मात्र बोलण्यास कचरतात. याचे कारण म्हणजे वडिलांबद्दल आदरयुक्त भीती म्हणावी लागेल. परंतु ज्याप्रमाणे  नारळ वरून टणक असते  मात्र आतून गोड आणि मऊ असते. त्याचप्रमाणे वडील देखील कठोर वाटत असले तरी मनाने ते हळवे, प्रेमळ असतात. ज्या घरात वडील असतात त्या घराकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही, हे वास्तव आहे. आपली स्वप्न मुलांच्या रूपाने पूर्ण करण्यासाठी वडील दिवस रात्र झटत असतात. हे करीत असताना स्वतच्या काही इच्छा आकांशा आहे हे देखील विसरून जातात. जे जे आपल्याला भेटलं नाही ते ते मुलांना देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. हे करत असताना कोणताही गाजावाजा करत नाही.

प्रत्येक मुलांच्या दृष्टीने त्यांचे बाबा त्यांचे सुपरहिरो असतात, आदर्श असतात, रोल मॉडेल असतात. मुले विशेषत: आईपेक्षा वडिलांचे अनुकरण जास्त करीत असतात. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण उद्याचा जबाबदार नागरिक घडू शकतो. बऱ्याचदा वडील आणि मुले या नात्यात दरी निर्माण होते. विशेषतः मुले मोठी झाली की ते प्रकर्षाने जाणवते. बाप आणि मुलगा असा संघर्ष अधिकतर पहावयास मिळतो.आपण इतके सर्व करून ही मुले आपल्या पासून मनाने दूर का जातात? हा प्रश्न ही बऱ्याच वडिल वर्गाला पडतो. त्यादृष्टीने…

आपली स्वप्न मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. परंतु जास्त अपेक्षा करू नका. कारण प्रत्येकाची कुवत, आवड निवड वेगळी असते. मुलांकडे स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून बघा. मुलांचे चांगले मित्र बना जेणे करून मुले मोकळेपणाने तुमच्याशी बोलतील आणि नात्यात दुरावा येणार नाही.

माझ्या मुलाने हे केलं पाहिजे, ते केले पाहिजे असा अट्टाहास न करता त्यांच्या मताचा ही आदर करून, काही चुकत असल्यास मार्गदर्शन करा. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढेल. शिवाय निर्णय घेण्याची क्षमताही विकसित होईल.

आपण मुलांना लहानपणापासूनच शिस्त लावली पाहिजे हे जरी गरजेचे असले तरी शिस्तीच्या नावाखाली शारीरिक शिक्षा, अपशब्द, मारहाण करू नका कारण अति शिस्त देखील एकतर मुलांना घाबरट, बुजरे बनवत असते किंवा आक्रमक, हट्टी, चिडखोर बनवीत असते. म्हणून हसत खेळत मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. याशिवाय मुले आईपेक्षा वडिलांचे अनुकरण जास्त करीत असतात हे लक्षात घेऊन मुलांच्या समोर आपले वर्तन समतोल आणि सुव्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा.

पालकांच्या अति अपेक्षा मुलांना तणावग्रस्त करतात. झालेच पाहिजे, केलेच पाहिजे असा हव्यास न धरता त्यांना हवे ते करियर निवडीची संधी द्या. ज्यामुळे ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील. तुम्ही जबाबदार वडील आहात यात वादच नाही. परंतु गोष्टी विचारात घेतल्या तर मुलगा आणि वडील यांच्या नात्यांमध्ये अजूनच गोडवा निर्माण होईल. आपण आपल्या मुलांसाठी सुपरहिरो तर आहातच शिवाय चांगले मित्र देखील होऊ शकाल. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा त्यांचे भावविश्व वाढलेले असते. मित्र परिवार वाढलेला असतो, अशावेळी वडिलांनाही मित्र माना. तुमच्या समस्या मोकळे पणाने बोला. खरेतर वडीलांसारखा दुसरा मित्र असूच शकत नाही. बदलती जीवनशैली त्यांनाही शिकवा जेणेकरून तेही बदलत्या जीवन शैलीशी जुळवून घेतील.

मान्य आहे रोजचे व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही घरात जास्त वेळ देऊ शकत नाही. परंतु एक दिवस खास वडीलांसाठी काढा. दिवसाची सुरुवात प्रेमाने मिठी मारून करा. त्यांच्या सोबत मोकळ्या गप्पा मारा, आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. काहीतरी गिफ्ट द्या. अगदी नाहीच जमले तर एक गुलाबाचे फुल देऊन आभार व्यक्त करा, रात्रीचे जेवण त्यांच्या आवडीचे  बनवा, एक घास प्रेमाचा स्वतः हाताने भरावा. मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरील निर्मळ आनंद. या एका दिवसाने खूप काही बदल होतील त्यांच्यात आपण अजुन ही आपल्या मुलांसाठी तितकेच महत्त्वाचे आहोत ही भावना च त्यांना जगण्याची ऊर्जा प्राप्त करून देईल.

अर्थात हे एका दिवसासाठी मर्यादित न राहता वेळ मिळेल तेव्हा त्यांना वेळ देत जा. त्यांच्या ही काही समस्या असू शकतात समजून घ्या. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुमचे  गरजा,हट्ट पुरवताना त्यांनी स्वतः च्या आवडीनिवडी कडे लक्ष दिले नाही. आत्ता वेळ तुमची आहे, त्यांना ही वेळ द्या ,त्यांचे ही हट्ट पुरावा. जे जे करता येईल ते ते करा. आज तुम्ही त्यांना वेळ द्या उद्या तुमची मुले तुम्हाला वेळ देतील. संस्काररुपी हे बीज एका पिढीकडून नकळत  दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होईल. तसेही तुम्ही देखील उद्याचे होणारे सुजाण आणि जबाबदार वडील आहात. तुम्ही जे जे कराल ते ते तुमच्या मुलांकडे वारस म्हणून प्रक्षेपित होईल. शेवटी निसर्गाचा नियम आहे”जे पेराल तेच उगवेल”!

आपण आता मोठे झालेलो आहोत, कर्ते झालेलो आहोत, आपल्याला आता सल्याची गरज नाही अस अहंभाव न बाळगता महत्वाच्या गोष्टी बद्दल निर्णय घेताना वडिलांचा सल्ला अवश्य घ्या कारण त्यांच्याइतका योग्य आणि निस्वार्थपणे सल्ला कोणी देऊ शकत नाही. तुम्ही कितीही मोठे झालात तरीही त्यांच्या दृष्टीने तुम्ही नेहमीच लहान राहाल. ते तुमच्या काळजीपोटी नेहमी तुम्हाला सल्ला देत असतील सूचना देतअसतील तर राग न करता शांतपणे ऐकून घ्या.

तुम्ही कितीही मोठे झाले तरीही वडिलांपेक्षा मोठे नक्कीच नाही.  कारण तुमच्या नावाच्या पुढे वडिलांचे नाव लागल्या शिवाय तुमच्या नावाला अर्थ प्राप्त होत नाही. आज सामाजिक वास्तव बदललं असले तरीही  वडिलांचा डीएनए मुलाची ओळख पटवितो हेही वैज्ञानिक वास्तव आहेच.

आजच्या दिवशी वडिलांना शुभेच्छा तर द्याच. परंतु त्या सर्व व्यक्तींना देखील शुभेच्छा द्या, ज्यांनी तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची, मित्रत्वाची, योग्य सल्लागाराची भूमिका निभावली आहे. मग तो मोठा भाऊ असेल, काका, मामा, मित्र असेल. त्या सर्वांनाही शुभेच्छा द्या ज्यांनी वडीलकीच्या नात्याने तुमच्यावर प्रेम केले. कारण जन्मदात्या वडिलांप्रमाणे पालन पोषण करणारे देखील महत्त्वाचे असतात. म्हणून तर भगवान श्रीकृष्णाच्या नजरेत  वासुदेव आणि नंद बाबा दोघेही समानच किंबहुना नंद बाबाचे पारडे अधिक जड!

पिता धर्म: पिता स्वर्ग: पिताहि परम तप:।
पितरी प्रतीमापंन्ने प्रियंते सर्वदेवता:।।

सर्वांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/rDOs2MIa638

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!