इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
नव्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये येणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी द्वितीय मेळावा संपन्न झाला. इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी येथील अतिदुर्गम शाळेत शाळा प्रवेशोत्सव मेळावा उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या कुशल नियोजनानुसार ह्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी अंकुश माळी, छाया माळी, मनसेचे घोटी शहराध्यक्ष निलेश जोशी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या मातांना साडीभेट, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. पेहेचान प्रगती फाऊंडेशनकडून विद्यार्थी, गावकऱ्यांना सोनपापडीसह भरपेट जेवण देण्यात आले.
शाळा पूर्वतयारी ह्या अभियानाचा द्वितीय मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकीवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवला गेला. शाळेतुन गावकरी, पालक व विद्यार्थी ह्यांची ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. शैक्षणिक वर्षात शाळेत नवीन दाखलपात्र विद्यार्थी यांचे शाळेच्या आवारात गुलाब पुष्प देऊन शाळेतील पहिले पाऊल ठसे घेऊन स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेतील सर्वं मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगिवले, ग्रामपंचायत सदस्य चांगुणा आगिवले, खेमचंद आगिवले, बबन आगिवले, लहानू आगिवले, अंगणवाडी सेविका सुनिता दरवडे व सईबाई आगिवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक दत्तू निसरड यांनी परिश्रम घेतले.