हरसूल जिल्हा परिषद गटातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी रुपये मंजूर : खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांच्या प्रयत्नांना यश ; हरसुल गटातील चिंचवडसह ६ गावांचा समावेश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

हरसुल आणि परिसरातील गावांमधील सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, हरसुलच्या जिल्हा परिषद सदस्या इंजि. रूपांजली माळेकर यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. नुकतीच शासनाने जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत राज्यातील ६० पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली असून यामध्ये हरसुल गटातील चिंचवडसह ६ गावांचा समावेश आहे. चिंचवड व ६ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. येत्या काही महिन्यात पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या इंजि. रूपांजली माळेकर यांनी दिली आहे. आदिवासी भागातील पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने तब्बल १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून हरसुल आणि परिसरातील गावांमधील नागरिकांना सततच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाई विषयीच्या अनेक तकारी हरसुल आणि पंचकोषितील नागरिकांकडून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे आल्या होत्या. नागरिकांकडून आलेल्या तकारींची दखल घेत गोडसे यांनी या समस्येविषयी आमदार हिरामण खोसकर आणि जिल्हा परिषद सदस्या इंजि. रूपांजली माळेकर यांच्याशी चर्चा करत शासनाकडे पाणीपुरवठा योजना मंजूरीसाठीचे प्रयत्न सुरू केले होते. खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर आणि जिल्हा परिषद सदस्या इंजि. रूपांजली माळेकर यांच्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. नुकतीच शासनाने जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत हरसुल गटातील चिंचवडसह ६ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून याकामी १३ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या गावांमध्ये चिंचवड, जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रुक, सारस्ते, चिरापाली, सापतपाली, महादेवनगर या गावांचा समावेश आहे. या योजनेच्या कामांना येत्या काही दिवसांत प्रशासकीय मान्यता मिळणार असून या कामांना लवकरच प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

गेल्या चार वर्षाच्या प्रयत्नातून चिंचवडसह ६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. यामुळे ही ७ गावे लवकरच पाणीटंचाईमुक्त होणार आहे. योजना मान्यतेच्या कामासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर यांचे मार्गदर्शन आणि सततचा पाठपुरावा उपयुक्त ठरला.

- इंजि. रूपांजली माळेकर, जिल्हा परिषद सदस्या हरसूल

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!