शब्दांकन : लक्ष्मण सोनवणे, पत्रकार
सुखी संसाराचा गाडा हाकताना अचानक पतीच्या निधनाने खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या महिला आपल्याला पाहिला मिळतात. पतीचा आधार नसूनही अनेक महिलांचा आपल्या मुलांना घडविण्यात मोलाचा वाटा असतो. मेहनत आणि अपार कष्ट करून अशिक्षित असूनही आपल्या मुला मुलींना यशाचे पंख जोडणाऱ्या घोटी येथील आदिवासी समाजाच्या रणरागिणी कै. झुणकाबाई तुकाराम नारळे वय 96 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जीवन पटलावरील आदर्श आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहे.
पती कै. तुकाराम नारळे यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा आधार गेला. मुलेही लहान होती. त्यानंतर सर्व जबादारी झुणकाबाईवर येऊन ठेपली होती. गरीब परिस्थितीवर मात करीत अतिशय दुर्गम भागातील वैतरणा, टाकेद, झारवड येथे आठवडा बाजारात भाजीपाला विकून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असूनही हार न मानता स्वतः उपाशी राहून मुलाला शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. मुलगा अंबादास तुकाराम नारळे यांना शिक्षक बनवून त्याच्या पंखात आदिवासी समाजाची सेवा करण्याचे बळ भरले. या माध्यमातून त्यांनी आडवण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करून आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. झुणकाबाई यांना तीन नातू, तीन मुली असून त्या शेती व्यवसाय करतात. सुनबाई वनिता नारळे ह्या सामाजिक काम करत असून त्यांनी 2008 मध्ये घोटी ग्रामपालिकेच्या सदस्यपदी काम केलेले आहे. आदिवासी समाजातील अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले. अपार कष्ट करून मुलांना चांगल्या हुद्द्यावर पोहचविणाऱ्या घोटीच्या आदिवासी समाजातील रणरागिणी कै. झुणकाबाई तुकाराम नारळे यांच्या पश्चात मुले अंबादास तुकाराम नारळे, रामजी विठोबा नारळे, मुलगी सुशीला बंडू कशाळ, मंदा कुंडलिक खाडे, मीरा दत्तू डामसे, नातू स्वप्नील अंबादास नारळे, नात गायत्री अंबादास नारळे, पूजा अंबादास नारळे, रुपाली रवी दिघे, पुतणे लक्ष्मण विठोबा नारळे असा परिवार आहे.
माझी आई मायेचा अथांग सागर होती. स्वतः उपाशी राहून आम्हाला तिने घास भरवला. अगदी जबाबदारीने भाजीपाला विकून तिने आमचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या पाठींब्यामुळे मी शिक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो. बहिणी उत्तम शेती करतात.
- अंबादास नारळे, निवृत्त प्राथमिक शिक्षक घोटी