इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
निलेश काळे यांच्याकडून
झाडे लावा झाडे जगवा बाबत शासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येते. विशेष कार्यक्रमही घेतले जातात. मागील काही वर्षांत राज्य सरकारकडून कोटीच्या घरातील वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आले. हे सगळे कागदोपत्री का होईना अंमलात सुद्धा आणण्यात आला. इगतपुरी तालुक्यात यंदा वनविभागाच्या हद्दीमध्ये दिवसागणिक आग लागण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. ही आग वणवा आहे की मानवनिर्मित आहे ह्याचा नागरिकांना प्रश्न पडला आहे. ह्यावर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
विज्ञानाच्या संशोधनानुसार फांदीवर फांदी घासल्याने आगीची निर्मिती होते. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात वणवा लागण्यासारखे घनदाट जंगल कुठेही नसल्याचे एकंदरीत दिसत आहे. त्यामुळे लागणारी आग ही वणवा आहे की मानवनिर्मित आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना हा नेहमीच बुचकळ्यात टाकणारा विषय ठरतो आहे.
लागणाऱ्या आगीमुळे वन्य क्षेत्र कमी होत असून जंगली प्राण्यांना आडोसा असलेल्या झाडे-झुडुपे जळून खाक होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी, जंगली श्वापदे, बिबटे रोजच नागरिकांच्या निदर्शनास येत असतात. इगतपुरी तालुक्यात अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले असून काहींचा त्यात दुर्दैवी अंत झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा संबंध आगीशी असल्याचे नागरिक सांगतात. आगीने चवताळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना अपंगत्व आले आहे.
आगीमुळे जंगली भागातील आगीमुळे वन्य श्वापदे वनविभागाचा अधिवास सोडून मानवी वस्तीत प्रवेश करून हल्ले करत आहेत. यावरून डोंगरातील वणवा-जंगली प्राणी-बिबटे याचे कनेक्शन आहे का ? ह्याची पडताळणी नाशिकच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी होत आहे.