इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषेत समाजबांधव सहभागी झाले होते. नवमी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस असून, माहेश्वरी समाजाची उत्पत्ती महादेवाच्या वरदान स्वरूपात झाल्याचे मानले जाते. महेश नवमी माहेश्वरी धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा प्रमुख सण आहे. भगवान महेश यांची मूर्ती रथात बसवून रथ फुलांनी सजविण्यात आला होता. शहरातील बालाजी मंदिरापासून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत पुरुषांनी पारंपारिक पांढरे वस्त्र तर महिलांनी लाल रंगाच्या साड्या असा पेहराव केला होता. आग्रा रोड मार्गे नगरपरिषद येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वळसा घालून लोया रोड, पटेल चौक, महालक्ष्मी मंदिरापासून माहेश्वरी मंगल कार्यालय येथे शोभायात्राचा समारोप करण्यात आला. जय महेश जय बालाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. रात्री आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला.