घराघरात बबड्या असतो बिझी ; मिळतो रोजचा दोन जीबी

लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटील
दै.अजिंक्य भारत,अकोला
संवाद -9892162248

आंतरजाल ज्याला मराठीत इंटरनेट म्हटले जाते त्याची दुनिया मोठी जादूई असते. काही वर्षापूर्वी शहरात नेट कॅफेवर दहा रुपये तास शुल्क भरून तरुणाई चार, पाच तास खर्च करायची. अलीकडे प्रत्येकाच्या हातात पाचपट वेगाने चालणारे इंटरनेट उपलब्ध झाले आहे. घरोघर टीनजर मुले, कुठल्या तरी कोपर्‍यात पडून तासन्तास डोळ्यांच्या खोबण्या बाहेर काढीत त्या चार इंचाच्या पडद्याशी एवढे एकरुप झालेत की पालक बेचैन झाले आहेत.
मानसोपचार, बालरोग आणि नेत्रतज्ज्ञांकडे सध्या सर्वाधिक तक्रारी या मोबाइल वेडाच्या येत आहेत. कोरोनाने पाचवीपासून पुढे सर्वांना ऑनलाइन राहण्यासाठी मजबूर केल्यामुळे एकाच घरात आता बकेट भरून डाटा उपलब्ध झाला आहे. फावल्या वेळेत घरातले चार सदस्य हॉलमध्ये कधीकाळी गप्पा मारताना दिसत होते. आता कोणत्याही घरात जा, कडक कर्फ्यू लागलेला अन् स्मशान शांतता असते.
उन्हामुळे सगळेच घरात असतात परंतु कुणाचाही आवाज नाही. एकाच हॉलमध्ये सगळे कसे शिस्तीत आपापल्या मोबाइलवर कामात मग्न असतात. बाप ऑफिसच्या ग्रुपवर चॅटिंगमध्ये, आई युट्युबवरील किचन शोमध्ये तर दोन्ही मुले नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन किंवा कुठल्यातरी वेब सीरीज बघण्यात गुंतलेले असतात.
दररोज मिळणारा दीड-दोन जीबी डाटा त्याच दिवशी खर्च करावा लागतो. दुसर्‍या दिवशी त्याचा संग्रह राहत नाही. त्यामुळे त्यासाठी प्रसंगी रात्री उशिरापर्यंत जाणून डाटा खर्च करायला हवा ना. कशाला आपलेच नुकसान करायचे असा सुज्ञ विचार करणार्‍या अनेक तरुणांनी निद्रानाश ओढवून घेतला आहे. अनेक दिवस योग्य प्रमाणात झोप होऊ न शकलेली मुलं पालकांवर पटकन चिडायला लागली आहेत. काही वेळाकरिता जरी मोबाइल लपवून ठेवला तरी हिंसक होणार्‍या पातळीवर मुले यायला तयार झाली आहेत.
मोबाइल आणि स्क्रीन टाईमचे जबरदस्त व्यसन मुलांना लागले आहे. परवा पुण्यात खूप वेळ मोबाइल बघणार्‍या 15 वर्षीय मुलाच्या हातून बापाने रागाने मोबाइल हिसकावला आणि त्या भरात फोडून टाकला. त्याचवेळी मुलाने तिसर्‍या माळ्यावरून उडी टाकून आपले प्राण गमावले. नेमके काय होतेय? आपण या परिस्थितीचा सामना कसा करावा? मुलांना कसे समजावून सांगावे? यासाठी पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. मुबलक डेटा वापरात पोर्न क्लिप बघणार्‍या मुलांची एक वेगळीच समस्या यानिमित्ताने उभी झाली आहे.
कोणत्याही गोष्टीचे प्रमाण अती झाले की त्याचे व्यसनात कधी रुपांतर होते हे कळत नाही. व्यसनाच्या नादी लागलेल्या एकालाही आपण व्यसनी झालोत हे मान्य नसते. इतर लोक उगाचच आपल्यावर आळ घेतायेत असे त्याला वाटत असते.
आधी मोठ्या शहरात असणारा हा दीड-दोन जीबी डेटा वाटपाचा कार्यक्रम आता गावोगाव पोहोचला आहे. रोजचा दीड-दोन जीबी अन् बबड्या बिझी आहे. काही सवयी पालकांनी न कळत मुलांना लावल्या आहेत. आई-वडिलांच्या कामात सतत अडथळे निर्माण करणारे मूल गुंतून राहावे म्हणून त्याच्या हाती मोबाइल देणारे पालक आता चिंतेत पडले आहेत. काही पालक तर अभिमानाने सांगतात की आम्हाला कळत नाही. यापेक्षा कितीतरी पट आमच्या पिंट्याला मोबाइलमधले कळते, हा सतत मोबाइलशी खेळत असतो, म्हणून त्यातला तो तज्ज्ञ झालाय. काही पालक तर मुलांच्या समोर मोठ्या अभिमानाने सांगतात की आमचा श्रीरंग ना मोबाइल काढून घेतला की नुसता थयथयाट करतो, घर डोक्यावर घेतो. पालक मुलांना घर डोक्यावर घेण्याची प्रेरणा देताहेत की त्याचे कौतुक करताहेत हेच कळायला मार्ग नाही.
कुटुंबातील प्रत्येकाला मोबाइल देण्याची गरज आहे का? या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या व्यक्ती घर किंवा कार्यालय या पलीकडे कुठेच जात नाहीत, त्यांनाही हमखास मोबाइल घेऊन देण्यावर नव्याने विचार व्हायला हवा. मोबाइल संपर्काचे साधन म्हणून बाळगायचे की स्टेटस, सिंबॉल यावरही चिंतन व्हायला हवे. इंटरनेट ज्याच्या मोबाइलवर नाही त्याला तर अलीकडे मागासलेला अविकसित अन् आदीम समजले जात आहे.
मोबाइलच्या अतिवापराने डोळ्यांच्या समस्या वाढत असताना मुले अबोल, चिडचिडी, एकलकोंडी आणि हिंसक बनली आहेत. आता तक्रार करणार्‍या पालकांनो यात तुमचा सहभाग किती आहे हे भुतकाळात डोकावून बघा म्हणजे कळेल आपणच पायावर कसा दगड हाणलाय तो.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!