पुस्तक परीचय : सातपाटील कुलवृत्तांत (शब्दालय प्रकाशन)

लेखन : प्रमोद गायकवाड (संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम)

कालच प्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांचे “सातपाटील कुलवृत्तांत” हे पुस्तक वाचून संपवले. नगर जिल्ह्यातील पठारे नामक सामान्य कुटुंबाच्या वंशावळीसंबधी अनेक वर्षे संशोधन करून मिळवलेल्या माहितीतून लिहिलेला विशाल पट!


साधारणपणे पुस्तक कितीही मोठं असो, तीन चार दिवसात संपवायचे हा माझा नेहमीच शिरस्ता. पण हे पुस्तकच इतकं अफाट आहे की ते वाचायला मला दहा दिवस लागले. कितीतरी पानं पुन्हा पुन्हा वाचत रहावी अशी… साधारण सातशे वर्षांचा कालखंड, त्यातील कितीतरी पात्रे, डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहाणारे प्रसंग, तत्कालीन राजकीय परिस्थितीशी त्या सर्व पात्रांचा संबंध या सर्वांचा विचार करता पठारे सरांनी किती परिश्रमाने हे पुस्तक लिहिले असेल याची कल्पना येते. त्या काळातील जातीय, धार्मिक आणि प्रांतिक वास्तवाची जाणीव तर वाचताना पानोपानी येते. हे पुस्तक कुलवृत्तांत म्हणायचे, की कादंबरी, की अस्सल ऐतिहासिक दस्तवेज? अफाट ताकदीचे हे पुस्तक आहे.
मूळ पुरुष श्रीपतीपासून सुरु होणारे अनेक पिढ्यांचे हे कथानक पैठणपासून सुरु होऊन अहमदनगर, सातारा, पुणे, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, पानिपत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मुंबई ते अगदी इंग्लंडलाही फिरवून थेट संगमनेरातील सध्याचा वंशज देवनाथपर्यंत आणून सोडते तेंव्हा आपले डोके अक्षरशः गरगरते. राजकीय स्थितीचा विचार केला तर देवगिरीचे साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, होळकर, इंग्रज ते स्वतंत्र भारताच्या तत्कालीन परिस्थितीवरही भाष्य करते. सामाजिक सुधारणेच्या प्रांतात त्या त्या काळात होऊन गेलेले संत तुकाराम महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या थोरांच्या कार्याचा तळागाळातील समाजावरील समर्पक परिणामही जागोजागी सापडत रहातो.
खरे म्हणजे आजवर ऐतिहासिक प्रकारात मोडणारी जी काही संदर्भ ग्रंथ, चरित्रे किंवा कादंबऱ्या मी वाचल्या आहेत त्या सर्व सत्ताधिशांशी संबंधित इतिहासाच्या होत्या. ही पुस्तकं जेत्यांवरची असोत किंवा पराजितांवरची, त्यातली बहुतांश होती तर ती सर्व सत्तेशी संबंधित. ती वाचताना या सर्व शेकडो वर्षांच्या उलथापालथीत गाव खेड्यांवरची सामान्य जनता कशी जगत असेल, त्यांच्या आयुष्यात काय स्थिंत्यतरे घडली असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल, राजा बदलला तर त्यांच्या जगण्यात काय फरक पडत असेल याविषयी माझ्या मनात नेहमीच प्रश्न पडत. सातपाटील कुलवृत्तांत वाचून या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत, असे आता निश्चितच म्हणता येईल.
या पुस्तकाचे मला भावलेले सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आलेले सर्व तत्कालीन सत्ताधीश आहेत दुय्यम भूमिकेत आणि केंद्रस्थानी आहे अगदीच सामान्य घरातील सातपाटील वंशावळ. तेराशेव्या शतकात श्रीपतीचे आयुष्य तेंव्हाच्या सामाजिक परिस्थितीनुरूप कसे होते आणि पुढे शिवाजी महाराजांपासून अन्य राज्यकर्त्यांच्या काळातील साहेबराव, दसरत, आरेनराव, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव, मालोजी आणि देवनाथ या वंशजाच्या जीवनात कसे बदल होत गेले याचे जे सूक्ष्म वर्णन पुस्तकात केले आहे त्याला खरोखर तोड नाही.
शेवटच्या प्रकरणातील देवनाथचे निरूपण तर शब्दातीतच आहे. आजच्या महाराष्ट्रीय माणसाच्या सिंधू संस्कृतीपासूनची पाळंमुळं अभ्यासून विश्वाच्या अफाट पसाऱ्यातील आपल्या यत्किंचित आस्तित्वाचं अस्वस्थ करणारं भान देत एका विलक्षण क्षणी पुस्तक संपतं…
माझ्या दुर्दैवाने रंगनाथ पठारे सरांचे यापूर्वी एकही पुस्तक वाचले नव्हते. मात्र त्यांचे सातपातील कुलवृत्तांत हे पहिलेच पुस्तक वाचून ते आता निश्चितच आवडत्या लेखकांच्या यादीत आले आहेत. त्यांची इतर पुस्तकेही लवकरच माझ्या वैयक्तिक संग्रहात दाखल होत आहेत हे सांगणे न लगे.
अगदीच थोडक्यात सांगायचे तर सातपातील कुलवृत्तांत हे कित्येक शतकात एखादेच निर्माण होणारे “महाराष्ट्रातील महाभारत” आहे असे म्हणता येईल. भालचंद्र नेमाडे यांच्या “हिदू” नंतर मराठीत ज्ञानपीठ देण्याच्या तोडीचा हा “सातपाटील कुलवृत्तांत” आहे असं मला वाटतं.

  • प्रमोद गायकवाड
    gaikwad.pramod@gmail.com

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!