यमपुरी की इगतपुरी ? अपघात थांबवणार आहात का नाही ? आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके यांचा आक्रमक सवाल : अखेर गोंदे फाट्यावर उड्डाणपूल होण्याचा मार्ग मोकळा ; मुंढेगावला होणार अंडरपास आणि उद्यापासून अत्यावश्यक कामे तात्काळ होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असणाऱ्या बहुतांश गावांत अपघातांचे प्रमाण पाहता बळी जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासन ढिम्म झाले आहे. त्यामुळे इगतपुरी की यमपुरी ? अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करून युद्धपातळीवर महामार्गाला अपघातमुक्त करावे अन्यथा महामार्ग प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण करावे लागेल असा सज्जड इशारा इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांना दिला आहे. “अपघातपुरी की इगतपुरी ??” ह्या मथळ्याखाली “इगतपुरीनामा” न्यूजकडून अपघातांची इत्यंभूत माहिती प्रसिद्ध होत आहे. अपघातांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झालेला आहे. “इगतपुरीनामा” वरील बातम्यांची दखल घेऊन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, अरुण पोरजे यांनी आक्रमक भूमिका घेऊन महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारला.

यावेळी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत गोंदे दुमाला फाट्यावर उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचा अत्यावश्यक निर्णय घेण्यात आला. गोंदे हे महत्वाचे ठिकाण असून येथे मोठ्या प्रमाणात अपघातांचे हॉटस्पॉट निर्माण झाल्याची बाब आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके यांनी उपस्थित केली. त्यानुसार शक्य तेवढ्या लवकर गोंदे येथे उड्डाणपुल बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मुंढेगाव येथेही अंडरपास करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मागण्यांसह अन्य विविध मागण्यांवर उपस्थितांनी अधिकाऱ्यांशी दीर्घ चर्चा केली. उद्यापासून महामार्गावर अत्यावश्यक असणाऱ्या अनेक सुविधांची कामे युद्धपातळीवर हाती घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “इगतपुरीनामा” न्यूजने घेतलेल्या भूमिकेमुळे जनहिताच्या विषयांचा पाठपुरावा सुरूच ठेवण्यात येणार आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून अपघात थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने न झाल्यास त्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा कुठल्याही क्षणी निर्णय घेऊ असा सज्जड इशारा आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके आदींनी दिला आहे. दरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षा कृती समिती स्थापन झालेली असून ह्या समितीनेही महामार्ग प्राधिकरणाला विविध मागण्यांचे निवेदन दिलेले आहे. एकंदरीत इगतपुरी तालुक्यात वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये आक्रमकता निर्माण झाली असल्याने प्रशासनही जागे झाल्याचे दिसून येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!