लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांमुळे वाहनधारकांचा आणि पादचाऱ्यांचा अक्षरश: काळजाचा ठोका चुकत आहे. प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. हे चित्र आहे मुंबई नाशिक महामार्गावरील. विविध प्रकारच्या जीवघेण्या अपघातात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वर्षभरात महामार्गावर १५० पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. २५० व्यक्ती जखमी झाले तर १५ जणांना प्राण गमवावा लागला आहे. महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सततच्या अपघातांमुळे महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे.
नाशिक मुंबई महामार्गावरून अनेक वाहनांची नेहमीच वर्दळ असते. लेकबिल फाट्यापासून पाडळी फाट्यापर्यंत गतिरोधक नसल्याने अपघातात वाढ झाली. दररोज छोटे मोठे अपघात म्हणजे नित्यनियमाचे ठरले आहे. त्याचप्रमाणे महामार्गावर लेकबिल फाट्यावर झाडे वाढली असून वाहने दिसत नसल्याने अपघात होत आहे. पाडळी फाट्यावर महामार्गावरील व भुयारी पुलात सौर ऊर्जेवर चालणारे पथदीप अनेक दिवसांपासून बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी अंधाराचा फायदा घेत बिबट्याने भंगार गोळा करणाऱ्या महिलेवर हल्ला केला होता. त्यातच रायगडनगरच्या पुढे असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ पथदीप बंद असल्याने चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. महामार्गावर दिशादर्शक फलक मोडकळीस आले असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. महामार्गावर जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मोफत रुग्णसेवा २४ तास कार्यरत असून यामाध्यमातून बारा वर्षात झालेल्या अपघातात चार हजार व्यक्तींना जीवदान देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. अनेक जणांना जीवाला मुकावे लागले असून संबंधित विभागाने वेळेचे भान ठेवून सुविधा देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू.
- गोकुळ धोंगडे, अध्यक्ष छावा संघटना इगतपुरी