जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन ४ आणि ५ जूनला धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे होणार : महाअधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात – प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

४ आणि ५ जूनला धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन होणार आहे.  काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ह्या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमावेळी पूर्वसंध्येला होणारा जिजाऊ पालखी सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ह्या अधिवेशनात मोठ्या संख्येने राज्यातील महिलांनी सहभागी होऊन जिजाऊ ब्रिगेडची ताकद दाखवावी असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरी भदाणे यांनी केले आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशनाला आबालवृद्धांसह महिला, तरुणी यांचा ऐतिहासिक सहभाग लाभणार आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील दमंडकेश्वर लॉन्सच्या भव्य सभागृहात हा सोहळा होणार आहे.

४ जूनला जिल्ह्यातील जनतेला खास सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दुपारी ४ वाजता राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातुन भव्य शोभायात्रा निघेल. पिंपळनेर आणि परिसरासह राज्यभरातून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला, तरुणी भगव्या साड्या नेसून व डोक्यावर भगवा फेटा परिधान करत या शोभायात्रेत सहभागी होतील. शोभायात्रेत जिजाऊ पालखी, ग्रंथदिंडी यासह शिवकालीन शस्त्रकला, विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहेत. शोभायात्रा मार्गावर विविध संस्थांकडून रांगोळ्या काढल्या जाणार आहेत. मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होऊन अधिवेशनस्थळी दमंडकेश्वर लॉन्सवर शोभायात्रेचा समारोप होणार आहे. रात्री ७ वाजता विविध लोककलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभरातील विविध जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या विविध शाखांमार्फत महिलांनी आयोजित केलेला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला ऐतिहासिक कार्यक्रमांसह प्रबोधनात्मक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. सर्वसामान्य महाराष्ट्रीय रसिकांसाठी पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून ओळखल्या जाणार्‍या लावणीचा कार्यक्रम सुद्धा शनिवारी ४ जूनच्या रात्री होणार आहे. गोंधळ, भारूड, गवळण, नाटिका अशी समृद्ध लोककला यावेळी सादर केली जाईल.

रविवारी ५ जूनला सकाळी ८ वाजता औरंगाबाद जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांचा प्रसिद्ध शाहिरी जलसा कार्यक्रम झाल्यावर सकाळी १० वाजता उदघाटन सत्र सुरु होईल. त्यानंतर महिलांना मार्गदर्शनपर व्याख्यानात “ग्रामीण अर्थशास्त्र आज आणि उद्या” या विषयांतर्गत महिलांसाठी बचतगटांसह उद्योजक व्यावसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा, अनिष्ट कालबाह्य रूढीपरंपरा टाळण्यासाठी वर्तमान युगात महिलांनी कसे आचरण करावे यासंदर्भात “शिवधर्मातील महिलांचे स्थान” या विषयांतर्गत विविध तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
यावेळी मराठा सेवा संघाच्या विचारधारेनुसार शिवविवाह सोहळा संपन्न  होणार आहे. सायंकाळच्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना जिजाऊ रत्न, जिजाऊ गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. समारोपाच्या सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह शिवधर्म समन्वयक माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनाची तयारी जोरात सुरू असून मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर कॉर्नर बैठका, समित्या गठीत करण्याचे काम सुरु आहे. यात स्वागत समिती, सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रसिद्धी समिती, भोजन समिती, वाहन पार्किंग समिती, स्टेज सजावट समिती, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समिती, निमंत्रण समिती, निवास व्यवस्था समिती यासारख्या विविध समित्या तयार करण्यात येत आहेत.

जिजाऊ ब्रिगेडचे पहिले ग्रामीण राज्यव्यापी महाअधिवेशन पिंपळनेर येथे होत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर सूक्ष्म नियोजन करून विविध समित्या गठीत केल्या जात आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हातात आल्यानंतर कोरोनाच्या संकटात ऑफलाईन ऐवजी ऑनलाइन काम सुरु होते. आता कोरोना लाट ओसरल्याने हे अधिवेशन घेण्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक वातावरण आहे. ह्या महाअधिवेशनात महिलांनी सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र

■ लोककलेतून पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडणार
■ शोभायात्रेत भव्य जिजाऊ पालखी, ग्रंथ दिंडी यासह महिला संस्कृतीचे देखावे, प्रसिद्ध ढोल ताशे, शिवकालीन मैदानी शस्त्रकलांच्या प्रात्यक्षिकांचे दर्शन घडणार
■ सांस्कृतिक कार्यक्रमात गीत-संगीतासह लावणी नृत्याचा रंगणार कलाविष्कार
■ ग्रामीण महिलांचे अर्थशास्त्र, बचतगट, शासकीय योजना या विषयांवर विविध वक्ते करणार मार्गदर्शन

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!