

इगतपुरीनामा न्यूज – घोटी पोलीस स्टेशनमध्ये ९ ऑगस्टला श्रमिकनगर घोटी भागातील एका अल्पवयीन शाळकरी बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३५८, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार मुलीच्या आईने याबाबत फिर्यादी दिली. यावरून घोटी पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 350/2023 नुसार संशयित आरोपी संकेत मोतीराम आंबेकर रा. दुर्गानगर घोटी याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र संबंधित आरोपी फरार झालेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस हवालदार सागर सौदागर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश यंदे यांना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त माहिती द्वारे संशयित आरोपी संकेत मोतीराम आंबेकर असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ करमाळा पोलीस ठाणे हद्दीत जाऊन शिताफीने संशयित आरोपी संकेत मोतीराम आंबेकर ह्याला ताब्यात घेतले. २४ तासाच्या आत आरोपीला घोटी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार करीत आहेत.