भाविकांनी लाभ घेण्याचे तालुका सेवा समितीचे आवाहन
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या विचारांवर इगतपुरी तालुक्यातील हजारो भाविक अढळ निष्ठा ठेवतात. महाराष्ट्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आपल्याला सोपवलेल्या जबाबदारीची सेवा सुद्धा अनेक सेवेकरी नियमित करीत असतात. यासह गावोगावी आपल्या आदरणीय माऊलींचे प्रेरणादायी विचार प्रचार आणि प्रसार करण्याचे कामही तितक्याच आपुलकीने करतात. नानिजधाम संस्थानतर्फे इगतपुरी तालुक्यातील महामार्गावर डोळ्यांत तेल घालून अपघातग्रस्तांना अखंडित रुग्णसेवा देण्याचे काम २ मोफत रुग्णवाहिकांद्वारे केले जाते. ह्या सेवेमुळे देशभरातील हजारो लोकांना जीवदान मिळाले आहे. ह्या सेवेमुळे नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांमध्ये दैनंदिन वाढ होत असते. लाखो कुटुंबांना अध्यात्मिक विचारांच्या शक्तीने एकत्र आणण्याचे काम श्री संप्रदायाच्या माध्यमातून केले जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज आणि पीठाचे उत्तराधिकारी परमश्रद्धेय कानिफनाथ महाराज यांचा कार्यक्रम नाशिकला होतो आहे. १७ आणि १८ मे ह्यादिवशी होणाऱ्या समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळ्याचा लाभ भाविकांना मिळणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील हजारो भाविकांची मांदियाळी नाशिकला उपस्थित राहणार आहे. ह्या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इगतपुरी तालुका निरीक्षक राजेंद्र उदावंत, तालुकाध्यक्ष संतोष थोरात, महिला तालुकाध्यक्ष मनीषा गतीर आणि तालुका सेवा समितीने केले आहे.
आदरणीय माऊली म्हणजेच अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज हे इगतपुरी तालुक्यातील बहुसंख्य गावांतील भाविकांच्या हृदयात स्थानापन्न आहेत. त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरून करतांना इगतपुरी तालुक्यात श्री संप्रदाय झपाट्याने वाढला आहे. रत्नागिरी येथे जाऊनही भक्त मंडळी अध्यात्मिक विचारांची शिदोरी नियमित आणत असतात. जागतिक महामारीच्या विळख्याने सगळीकडे नैराश्य पसरले असतांनाच्या काळात इगतपुरी तालुका सेवा समितीने आधुनिक माध्यमांद्वारे सेवाकार्य सुरूच ठेवले. यामध्ये आपत्कालीन उपक्रम, वैद्यकीय सेवा, रुग्णसेवा, शैक्षणिक उपक्रम आणि गोरगरिबांच्या सेवेचा समावेश आहे. कोरोनामुळे मात्र माऊलींच्या दर्शनासह सत्संगाचा लाभ मात्र मिळू शकला नाही. परमपूज्य माउलींचा भव्य कार्यक्रम नाशकात होत असल्याने इगतपुरी तालुक्यातील भक्त मंडळी आणि तालुका सेवा समितीच्या उत्साहाला उधाण आले आहे. कार्यक्रमामध्ये सेवा करण्याची जबाबदारी मिळावी म्हणून शेकडो भक्त पुढे येत आहेत. १७ आणि १८ तारखेला विविध कार्यक्रम आणि अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे सुमधुर प्रवचन ऐकण्यासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत. यानिमित्ताने दर्शन आणि समस्या मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने भाविकांची मोठी संख्या इगतपुरी तालुक्यातून हजर असणार आहे. जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, उत्तर महाराष्ट्र उपपीठ, रामशेज किल्ल्याजवळ, पेठरोड, पंचवटी नाशिक येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. ह्या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इगतपुरी तालुका निरीक्षक राजेंद्र उदावंत, तालुकाध्यक्ष संतोष थोरात, महिला तालुकाध्यक्ष मनीषा गतीर आणि तालुका सेवा समितीने केले आहे.