

इगतपुरीनामा न्यूज – सकल मराठा समाजाचा वतीने इगतपुरी तालुक्यातील शेणित फाटा येथे १०१ एकर क्षेत्रावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नाशिक आदी तालुक्यातील गावागावांत सभेसाठी येण्याचे नियोजन सुरु आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव ह्या सभेसाठी येणार असून येण्याच्या मार्गांवर विविध प्रकारच्या सोयीसुविधा करण्यात येणार आहेत. शेणित येथील नियोजित सभा स्थळावरून मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला फुगा आज सोडण्यात आला. सभेच्या दृष्टीने आर्किटेक्ट प्लॅन करण्यात आला असून नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडणार आहे. जवळपास ३०० फुटी रॅम्प आणि १० फुट उंच स्टेज तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची १० बाय १० फुट व ११ फुट उंच मूर्ति व मनोज जरांगे पाटील हे स्टेज वर राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. महिला विभाग, शौचालय व्यवस्था, आरोग्य विभाग, पाणी, नाश्ता, स्टॅाल याबाबतचे सर्व नकाशे तयार झाले असुन सभेची तयारी जवळपास पुर्ण झाली आहे असे सांगण्यात आले.